देवगड, (प्रतिनिधी): राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM) अंतर्गत ग्रामपंचायत मोंड येथे नाचणी पिकाच्या बियाण्यांचे वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. देवगड पंचायत समितीचे सभापती मा. श्री. गणेश राणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाण्यांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत मोंडच्या प्रशासक श्रीमती शामल अनभवणे, प्रशासकीय समिती सदस्य श्री अभय बापट, ग्रामपंचायत मोंडपारचे प्रशासक श्री गणेश तिर्लोटकर, तालुका कृषी अधिकारी श्रीमती आरती पाटील, मंडळ कृषी अधिकारी श्री संभाजी जाधव, सहाय्यक कृषी अधिकारी श्री दीपक सांगोळे तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सहाय्यक कृषी अधिकारी श्री दीपक सांगोळे यांनी उपस्थित मान्यवर व शेतकरी बांधवांचे स्वागत केले. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी श्रीमती आरती पाटील यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी ग्रामपंचायत मोंडच्या प्रशासक श्रीमती शामल अनभवणे तसेच प्रशासकीय समिती सदस्य श्री अभय बापट यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन करताना पंचायत समिती सभापती मा. श्री. गणेश राणे यांनी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा प्रभावीपणे लाभ घेण्याचे आवाहन केले.
दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. नितेश राणे यांच्या 23 जून 2026 रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंचायत समितीच्या सेस फंडातून घरघंटीसाठी निवड झालेल्या दोन लाभार्थ्यांना मा. श्री. गणेश राणे यांच्या हस्ते घरघंटीचे वाटप करण्यात आले.
याशिवाय कृषी विभाग, देवगड यांच्या वतीने ‘गोकृपा अमृत’ या जैविक उत्पादनाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या प्रात्यक्षिकाला उपस्थित शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे आयोजन कृषी विभाग, देवगड यांच्या वतीने करण्यात आले असून शेतकऱ्यांनी विविध कृषी योजनांचा लाभ घेऊन उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.












