२३ वर्षांनंतर ‘तिलारी’च्या पोटातून उरले-सुरले गाव अवतरले; धरणग्रस्तांनी ‘मूळ गावी’ जागवल्या आठवणी!

​दोडामार्ग:सुहास देसाई

माणूस कितीही दूर गेला, तरी त्याची नाळ जन्माच्या मातीशी जोडलेलीच राहते. याचाच प्रत्यय नुकताच तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाहायला मिळाला. तब्बल २३ वर्षांनंतर, धरणाचा पाणीसाठा खालावल्यामुळे पाण्याखाली गेलेली गावे पुन्हा एकदा जमिनीवर खुली झाली आहेत. पाल, पाटये, सरगवे, आयनोडे, शिरंगे, केंद्रे खुर्द आणि केंद्रे बुद्रुक या विस्थापित गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत रविवारी (२१ जून) आपल्या मूळ गावी एक दिवस घालवून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या भावूक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दोडामार्गचे तहसीलदार गुरव यांनीही आपल्या टीमसह रविवारी सुट्टीच्या दिवशी या भागाला भेट दिली.

​…आणि डोळ्यांत पाणी तरळले!
​यंदा पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने तिलारी धरणाचा जलसाठा कमालीचा आटला आहे. त्यामुळे तब्बल २३ वर्षांपूर्वी पाण्याखाली गेलेली घरे, शाळा, मंदिरांचे अवशेष आणि पिढ्यानपिढ्या जतन केलेली झाडे आता उघडी पडली आहेत.

​कधीकाळी गावात असणारे आंब्या-फणसाची ती जुनी झाडे, बालपणी खेळलेली ती अंगणे आणि सरगवे गावात पूर्वी कपडे इस्त्री करण्यासाठी वापरली जाणारी कोळशाची इस्त्रीही या अवशेषांमध्ये आढळून आली. हे सर्व पाहून उपस्थित धरणग्रस्तांचे डोळे पाणावले.

​’त्या’ सुजलाम् सुफलाम् जीवनाची आठवण
​”पूर्वी आमच्या गावात बारमाही नदी वाहत होती. शेतात सगळं काही पिकायचं, त्यामुळे मीठ आणि साखर सोडली तर बाजारातून काही विकत आणावं लागत नव्हतं. गाई, म्हशी, कोंबड्या असं समृद्ध पशुधन होतं आणि शेतीला उत्तम शेणखत मिळायचं. गावातल्या मंदिरात सुखा-समाधानाचा वातावरण होतं. चिंता कशाचीच नव्हती,” अशी आठवण एका भावूक ग्रामस्थाने सांगितली.

​पुनर्वसनाचा दंश: ‘ना शेती, ना भाती; तरुणांच्या हाती फक्त बेरोजगारी’
​धरणामुळे विस्थापित झालेल्या या १० गावांतील सुमारे १० ते १२ हजार लोकांचे पुनर्वसन तर करण्यात आले, पण तिथे केवळ राहण्यासाठी जागा मिळाली. शेती आणि रोजगाराची कोणतीही सोय न झाल्याने आज या धरणग्रस्तांचे जगणे कठीण झाले आहे.

​पाण्यासाठी दाहीदिशा: ज्या गावांनी गोव्याची तहान भागवली, आज त्याच धरणग्रस्तांना नवीन गावात पाणी विकत घ्यावे लागत आहे.
​बाजारपेठेवर अवलंबित्व: शेती नसल्याने सुईपासून धान्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी बाजार करावा लागत आहे.
​तरुणांचे भवितव्य अंधारात: “ना नोकरी, ना छोकरी” अशी अवस्था झालेल्या येथील बेरोजगार धरणग्रस्त तरुणांमध्ये सध्या तीव्र असंतोष आणि हतबलता पाहायला मिळत आहे.

​गोव्याची ‘लाईफलाईन’ तिलारी; पण भूमिपुत्रांच्या पदरी काय?

​तिलारी प्रकल्पामुळे गोवा राज्याला मिळणाऱ्या एकूण १६ टीएमसी पाणीसाठ्यापैकी ७५% पाण्याचा पुरवठा केला जातो, तर महाराष्ट्राला २५% पाणी मिळते. या धरणातून वीज निर्मिती होऊन तीही गोव्याला दिली जाते. जगाच्या कानाकोपऱ्यातून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची तहान याच तिलारीच्या पाण्यावर भागते. पण, गोव्याला समृद्ध करणाऱ्या या प्रकल्पासाठी ज्या १० ते १२ हजार भूमिपुत्रांनी आपल्या सुजलाम् सुफलाम् जमिनींचा, घरांचा आणि आठवणींचा त्याग केला, ते धरणग्रस्त आज मात्र उपेक्षित जीवन जगत आहेत.

​२३ वर्षांनंतर निसर्गाने धरणाचे पाणी आटवून या धरणग्रस्तांना त्यांच्या मातीची भेट तर घडवून आणली, पण त्यासोबतच ‘आमचा त्याग कुणासाठी?’ हा धरणग्रस्तांचा मूळ प्रश्न पुन्हा एकदा प्रशासनाच्या समोर उभा ठाकला आहे.