न. प. सभापती मोहिनी मडगावकर यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
सावंतवाडी । प्रतिनिधी :शहरातील एसटी बस वाहतुकीच्या मुख्य मार्गावर पडलेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरू असून, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजप महिला मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला. नगरपरिषद सभापती मोहिनी मडगावकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरत संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले आणि सर्व खड्डे तत्काळ बुजवण्याचे सक्त निर्देश दिले.
या मुख्य मार्गावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना खोलीचा अंदाज येत नाही. नुकतीच या ठिकाणी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दोन महिला घसरून पडल्याची गंभीर घटना घडली होती. ही बाब निदर्शनास येताच महिला मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली. सभापती मोहिनी मडगावकर यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी बोलावून रस्त्याची प्रत्यक्ष दुरावस्था आणि परिस्थिती दाखवून दिली.
एसटी मार्गावरील या मोठ्या खड्ड्यांमुळे पादचारी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वार यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात अपघातांची तीव्रता अधिकच वाढल्याने, या मार्गावरील सर्व खड्डे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी आग्रही मागणी महिला मोर्चाने केली. यावर प्रशासनाच्या वतीने खड्डे बुजवण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
या आंदोलनात नगरपरिषद सभापती मोहिनी मडगावकर यांच्या समवेत भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस मेघना साळगावकर, साक्षी गवस, ज्योती मुद्राळे, मेघा भोगटे, तृप्ती विर्नोडकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.












