खेड (प्रतिनिधी) : राज्याचे गृहराज्य व महसूल राज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या पुढाकारातून खेड नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी पाच टक्के दिव्यांग आरक्षित निधीतून आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले. खेड शहरातील एकूण १३५ नोंदणीकृत दिव्यांगांपैकी पात्र ठरलेल्या ७७ लाभार्थ्यांना शुक्रवार, २६ जून रोजी या योजनेचा लाभ देण्यात आला. या मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असून, हा उपक्रम खेड येथील स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहात ना. योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी बोलताना ना. योगेश कदम यांनी सांगितले की, दिव्यांगांसाठी शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना उपलब्ध असल्या तरी आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे अनेक लाभार्थी त्या योजनांपासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेऊन खेड नगर परिषदेने दिव्यांगांना थेट आर्थिक मदत देण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत स्वागतार्ह आणि कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी नगर परिषदेला महत्त्वपूर्ण सूचना करत अनेक दिव्यांगांकडे यूडीआयडी (UDID) प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर पात्र दिव्यांगांना यूडीआयडी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या शिबिरामुळे अधिकाधिक दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खेड नगर परिषदेच्या या उपक्रमामुळे दिव्यांगांना केवळ आर्थिक आधारच मिळणार नसून त्यांना शासनाच्या विविध योजनांशी प्रभावीपणे जोडण्याचे कामही होणार आहे. दिव्यांगांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला गृहराज्य व महसूल राज्यमंत्री ना. योगेश कदम, माजी आमदार संजय कदम, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, नगराध्यक्ष माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, गटनेते निकेतन पाटणे, पंचायत समिती सभापती आफिया पालेकर, शहराध्यक्ष कुंदन सातपुते, नगरसेवक, पदाधिकारी, दिव्यांग लाभार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












