राजापुरात संततधार, ग्रामीण भागात पडझडीच्या घटना

साखर सडेचव्हाणवाडी येथे घरावर झाड पडून घराचे नुकसान
प्रशासनाकडून सतर्कतेच्या सुचना

राजापूर । प्रतिनिधी : गतसप्ताहापासून सक्रिय झालेल्या मान्सूनने आता चांगलाच जोर धरला आहे. सोमवारी दिवसभर काहीशी विश्रांती घेणाऱ्या पावसाने सोमवारी सायंकाळपासून चांगलाच जोर धरला. मंगळवारी दिवसभर राजापूर शहर आणि तालुका परिसरात पावसाने संततधार धरली आहे. गेले काही दिवस दमदार झालेल्या पावसाने u वादळी वारा यामुळे ग्रामीण भागात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. संततधार पडणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनही सतर्क झाले असून आपदग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार विकास गंबरे यांनी दिले आहेत.

राजापूर शहरात रानतळे रस्ता साखरकर वाडी नरेंद्र कोंबेकर यांच्या घराशेजारी रस्त्यावर फणसाचे झाड पडले व हा रस्ता बंद झाला. तर यामुळे लाईट चे पोल सुद्धा रस्तावर पडले होते. नगर परिषद प्रशासन व महावितरणकडून तात्काळ याची दखल घेत कार्यवाही करण्यात आली.

तर ग्रामीण भागातही या पावसामुळे पडझडीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये ग्रामपंचायत गोवळ खालचीवाडी येथील सेवानंद जोशी यांची संरक्षण भिंत कोसळून नुकसान झाले. तर ग्रामपंचायत विलये मध्ये लवू पांडुरंग तावडे यांच्या घराजवळ रस्त्यालगत संरक्षण भिंत कोसळली आहे. तर ग्रामपंचायत दोनिवडे मधील गवळी वाडी येथे.प्रशांत दशरथ कविस्कर यांच्या घरा शेजारी भिंत कोसळली आहे. तर साखर सडेचव्हाणवाडी येथील पार्वती वसंत घडशी‌ यांच्या घरावर झाड पडून त्यांच्या घराचे मोठे नूकसान झाले आहे. घरात कुणी नसल्याने सुदैवाने जिवीत हानी नाही .

राजापूर शहरासह ग्रामीण भागात पावसाचा जोर वाढल्याने प्रशासन देखील सतर्क झाले आहे. तहसीलदार विकास गंबरे यांनी आपदग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तर गाव पातळीवर कृषी अधिकारी, ग्राममहसुल अधिकारी यांना सतर्क रहाण्याच्या सुचना दिल्या आहेत.