संशयिताला अटक, मंडणगड पोलिसांचा तपास वेगात
मंडणगड । प्रतिनिधी : तालुक्यातील शेनाळे घाट परिसरात दारू कमी दिल्याच्या किरकोळ कारणावरून एका ४२ वर्षीय मजुराचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना ३० जून रोजी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी मंडणगड पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित प्रकाश गंगाराम वाजे (वय ४०) याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृताचे नाव सदू सखाराम मोकाशी (वय ४२, मूळ रा. मोकाशी पाडा, जव्हार, जि. पालघर, सध्या रा. शेनाळे) असे आहे. तर संशयित प्रकाश गंगाराम वाजे (वय ४०, मूळ रा. मोकाशी पाडा, जव्हार, सध्या रा. शेनाळे) हा मृताचा नातेवाईक असून दोघेही एकत्र मजुरीचे काम करत होते. नात्याने सदू मोकाशी हे प्रकाश वाजे यांचे चुलत मेव्हणे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दोघांनी एकत्र दारू पिण्यादरम्यान दारू कमी दिल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून संशयित प्रकाश वाजे याने मंगळवारी पहाटे सुमारे सव्वाचार वाजण्यापूर्वी सदू मोकाशी हे झोपेत असताना त्यांच्या डोक्यावर मोठा दगड टाकला. गंभीर मार लागल्याने त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, खून केल्यानंतर संशयिताने घटनास्थळावरून पलायन केले नाही. तो घटनास्थळाजवळच झोपून राहिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले.
या प्रकरणी विजय काते (रा. शेनाळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंडणगड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १०३(१) तसेच भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून फॉरेन्सिक पथक तसेच श्वानपथकाच्या मदतीने महत्त्वाचे पुरावे संकलित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. खुनामागील इतर कारणांचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
या कारवाईत विभागीय पोलिस अधिकारी शैलेश सणस यांच्या नेतृत्वाखाली मंडणगड पोलिसांनी तत्पर कारवाई केली. तसेच अप्पर पोलिस अधीक्षक बी. महामुनी यांनीही प्रकरणाचा आढावा घेऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.













