राज्यात पुढील आठवडाभर मुसळधार पावसाचा इशार
कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता; प्रशासन सतर्क
मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात ३० जून ते ६ जुलै या कालावधीत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने याबाबतची माहिती प्रसिद्ध करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाच्या बुलेटीननुसार महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीदरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून मध्य-ट्रोपोस्फेरिक द्रोणीय रेषा मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातून जात आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोकणात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाचा अंदाज असून २ ते ४ जुलै दरम्यान काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घाटमाथा परिसरात २ आणि ३ जुलै रोजी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातही बहुतांश भागांत व्यापक पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाड्यात २ व ३ जुलै रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
याशिवाय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ३० जून ते ४ जुलैदरम्यान वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा इशाराही देण्यात आला आहे.
संभाव्य परिस्थिती लक्षात घेता सखल भागांत पाणी साचणे, शहरी भागांतील रस्ते जलमय होणे तसेच घाट रस्त्यांवर दरडी कोसळण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी वाहतूक आणि हवामानाची माहिती तपासूनच बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अरबी समुद्रातील खराब हवामानामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असा सल्लाही प्रशासनाने दिला आहे. तसेच शेतकऱ्यांनी भातशेती व भाजीपाला क्षेत्रातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.













