कोकणातील उद्योजकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध: डॉ. संतोष राणे

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या कोकण विभागीय उपाध्यक्षपदी पदभार स्वीकारताना ग्वाही

मुंबई:कोकणातील उद्योजक, नवउद्योजक आणि लहान-मोठ्या व्यापाऱ्यांच्या शासन स्तरावर अनेक समस्या आहेत. विशेषतः आवश्यक वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने अनेक उद्योजक सध्या अडचणीत सापडले आहेत. अशा सर्व महत्त्वपूर्ण समस्या ताकदीने शासन दरबारी मांडून, त्यांचा योग्य पाठपुरावा करून त्या वेळेत मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चरचे नवनिर्वाचित कोकण विभागीय उपाध्यक्ष डॉ. संतोष राणे यांनी केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या नुकत्याच पार पडलेल्या २०२६ ते २०२८ या द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले चेंबरचे अध्यक्ष श्री. रविंद्र माणगावे यांच्या नेतृत्वाखालील ‘एकता पॅनेल’मधील सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदभार स्वीकारण्याचा सोहळा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात संपन्न झाला. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा. राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. संतोष राणे यांनी आपला पदभार स्वीकारला, त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना डॉ. राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा असून आज ३० वर्षे झाली तरी पर्यटन दृष्टिकोनातून ज्या गतीने या जिल्ह्याचा विकास व्हायला हवा होता, तसा तो झालेला नाही. म्हणूनच शासन व चेंबर यांच्या सहकार्याने कोकणच्या शाश्वत विकासाचा एक ‘रोड मॅप’ सादर करून, त्याची निर्धारित वेळेत अंमलबजावणी करण्यासाठी चेंबर आग्रही राहील.

सिंधुदुर्गात ‘शेठ वालचंद एक्सिलन्सी केंद्र’ सुरू करणार: उद्योगमंत्री उदय सामंत

सकाळच्या सत्रात नवनिर्वाचित समितीला मार्गदर्शन करताना राज्याचे उद्योगमंत्री मा. उदय सामंत यांनी जाहीर केले की, यापुढील काळात उद्योग विभाग आणि चेंबर हातात हात घालून महाराष्ट्रातील उद्योजकांच्या समस्यांचे निवारण करतील. याचाच एक भाग म्हणून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात चेंबर, उद्योजक व शासन यांची संयुक्त बैठक घेतली जाईल. तसेच बदलती उद्योगनीती आणि उद्योजकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन योग्य मार्गदर्शनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘शेठ वालचंद एक्सिलन्सी केंद्र’ सुरू करणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.

चेंबर आणि शासनामध्ये सामंजस्य करार होणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या सोहळ्यात चेंबरच्या नवीन पदाधिकाऱ्यांना संबोधित करण्यासाठी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित होते. आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रातील नवीन आव्हाने पेलण्यासाठी राज्यातील उद्योजकांनी आता सज्ज राहिले पाहिजे. यासाठी चेंबरचे तरुण व कार्यक्षम अध्यक्ष श्री. रविंद्र माणगावे आणि त्यांच्या सर्व नवनिर्वाचित टीमने शासनाशी सुसंवाद ठेवून सकारात्मक विचाराने पुढील वाटचाल करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासाठी चेंबर व शासन यांच्यात लवकरच एक सामंजस्य करार (MoU) करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

शतक महोत्सवी वर्षात कोकणचे काम लक्षवेधी ठरेल: रविंद्र माणगावे

कोकणातील चेंबरच्या सर्व निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा आणि नवनिर्वाचित उपाध्यक्ष श्री. राणे यांचा सन्मान करताना अध्यक्ष श्री. रविंद्र माणगावे यांनी आशावाद व्यक्त केला की, चेंबरला आता १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या शतक महोत्सवी वर्षात, इतकी वर्षे चेंबरच्या कामात मागे राहिलेला कोकण विभाग आता डॉ. संतोष राणे यांच्या अभ्यासू व दमदार नेतृत्वाखाली अत्यंत लक्षवेधी काम करेल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या पदभार ग्रहण सोहळ्यासाठी नवनिर्वाचित कौन्सिल सदस्य श्री. राजन नाईक, अॅड. नकुल पार्सेकर, श्री. विजय केनवडेकर, श्री. कुणाल वरसकर तसेच ट्रस्ट बोर्ड चेअरमन श्री. आशिष पेडणेकर प्रामुख्याने उपस्थित होते.