दोडामार्ग:प्रतिनिधी
दोडामार्गचे गटविकास अधिकारी (BDO) अजिंक्य सावंत यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईच्या प्रस्तावाचे सिंधुदुर्ग भाजप जिल्हा चिटणीस सुधीर दळवी यांनी जाहीर स्वागत केले आहे. कामचुकार आणि कुचकामी अधिकाऱ्यांची प्रशासनातून तात्काळ हकालपट्टी झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका दळवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून मांडली आहे.
प्रशासकीय अज्ञान आणि मनमानी कारभार
गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांना प्रशासकीय कामाचे अज्ञान असून, त्यांचा ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चा अभ्यास अपूर्ण आहे. या अपुऱ्या अभ्यासामुळे आणि मनमानी कारभारामुळे त्यांनी आजवर अनेकांवर अन्याय केला आहे. सावंत यांचा प्रशासनावर कोणताही वचक नव्हता आणि ते नेहमीच आपल्या कर्तव्यात कसूर (दुर्लक्ष) करत होते, असा थेट आरोप सुधीर दळवी यांनी केला आहे.
पालकमंत्र्यांकडे मांडणार लेखाजोखा
या संदर्भात सुधीर दळवी यांनी पुढे म्हटले आहे की,
“अजिंक्य सावंत यांच्या कुचकामी कारभाराबाबत आम्ही यापूर्वीच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्याकडे लेखी तक्रार केली होती आणि त्यांची बदली करण्याची मागणी केली होती. हीच बाब आता मा. जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी केलेल्या कारवाईच्या प्रस्तावाचे आम्ही स्वागत करतो.”
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, या जिल्हाचे पालकमंत्री तथा भाजप नेते मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांची लवकरच भेट घेणार असल्याचे दळवी यांनी सांगितले. या भेटीदरम्यान गटविकास अधिकाऱ्यांच्या संपूर्ण कारभाराचा लेखाजोखा त्यांच्यासमोर मांडून, अशा दोषी अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.













