माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार, यदुनाथ बेंडें यांच्या कल्पनेला दाद
लांजा (प्रतिनिधी) :तालुक्यातील साटवली येथील कै. व श्री श्रुतिका यदुनाथ बेंडे जुनियर कॉलेज, साटवली येथे एक विद्यार्थी – एक वृक्ष’ संकल्पनेतून वृक्षारोपण कार्यक्रम आज शनिवारी उत्साहात पार पडला.
झाडे लावा, जीवन वाचवा, भविष्य घडवा” आणि “एक वृक्ष – अनेकांचे जीवन” हा संदेश देत पाठवली विद्यालयाचे सर्वेसर्वा यदुनाथ बेंडे यांनी वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत साटवली पंचक्रोशी शिक्षण संस्था माजी विद्यार्थी संघाने वृक्ष लागवडीसाठी प्रतिसाद दिला होता. त्यानुसार माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून आज शनिवारी ११ जुलै रोजी कै. व श्री श्रुतिका यदुनाथ बेंडे जुनियर कॉलेज, साटवली येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आपल्या लाडक्या गुरूंच्या आवाहनाला प्रतिसाद देत, माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत नेटकेपणाने आयोजित केला आणि यशस्वी करून दाखवला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकर कदम यांच्या हस्ते व मार्गदर्शनाने करण्यात आली. या प्रसंगी माजी विद्यार्थी व शिक्षणप्रेमी श्याम बापेरकर यांनी मानवी जीवनात झाडांचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व पटवून दिले. यानंतर शालेय शिक्षणामध्ये आणि विविध क्षेत्रांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये मोनिका जाधव (१२ वी), हर्ष कदम (१० वी), सोहम निनावे (१० वी), श्रेयस भिंगे (१२ वी) आणि ओमकार घडशी (९ वी) या विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रत्यक्ष वृक्षारोपण करून या कार्यक्रमाची उत्साहात सुरुवात करण्यात आली.
एक विद्यार्थी – एक वृक्ष’ या संकल्पनेला सार्थ ठरवत महाविद्यालयातील विद्यमान विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षकवृंद आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने या मोहिमेत खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक प्रितम भालेकर यांनी केले. वृक्षारोपण मोहिमेत सहाय्यक शिक्षक सुनील कोरे, जाधव पी. आर., गुरव ए. एस., सहाय्यक शिक्षिका सौ. शिंदे एस. ए. तसेच श्रीम. चव्हाण पी. पी. यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून वृक्षारोपणात सहभाग घेतला. शिक्षकांसोबतच विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी समीर नारकर, गुरुप्रसाद वासुरकर, सखाराम जांगळी यांनीही या मोहिमेत मोलाचे सहकार्य केले. तसेच माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण, अमोल शिरवटकर, रुण गावचे उपसरपंच रमेश जाधव, पिंट्या हाजू, सादिक रखांगी यांच्यासह इतर माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी दीपक चंदुरकर, चंद्रकांत आंबोळकर, ॲड. आग्रे, प्रकाश चंदुरकर, जगदीश जुलूम, संतोष पड्यार, अनंत सूद, सुधाकर कुष्टे व त्यांच्या सहकारी माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आभार सहाय्यक शिक्षिका सौ. कोत्रे टी. वाय. (कोत्रे मॅडम) यांनी मानले.
माजी विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करत सुरू केलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे महाविद्यालयाच्या परिसरात एका नव्या हिरव्यागार पर्वाची उत्साही सुरुवात झाली आहे.













