रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या कामादरम्यान आजारी पडलेल्या २२ वर्षीय कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मोहम्मद मुरसलीम निजामुद्दीन (२२, रा. रेल्वे स्टेशन, कुंवारबांव, ता. जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मृत युवक गेल्या तीन आठवड्यांपासून रेल्वे स्थानक परिसरात कोकण रेल्वे स्थानक येथे फरशी बसविण्याच्या कामावर होता. कामादरम्यान त्याला ताप व उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने प्रथम खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. त्यानंतर प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले.
प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्याला नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.











