सवतकडा धबधब्याच्या निसर्गरम्य दृश्यांना साद!
प्रतिनिधी/रोहन कांबळे
कोल्हापूर:कोल्हापूरचा पश्चिम पट्टा पर्यटकांनी बहरला आहे.कोल्हापूरच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे डोंगररांगा हिरवाईने नटल्या आहेत आणि फेसाळणारे धबधबे कोसळू लागले आहेत. या निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटकांची भुदरगड किल्ला तसेच सवतकडा धबधबा आणि अन्य भागात मोठी गर्दी होत आहे.
कोल्हापूरातील ऐतिहासिक किल्ले भुदरगडावर राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नातून
पॅरामोटरिंग, पॅराग्लायडींग, झोरबिंग बॉल, वॉटर बोटींग, कायाकिंग, टेलिस्कोप,फ्लोटिंग जेटी हे साहसी खेळांच प्रकार सुरू करण्यात आले आहेत. शिवाय पर्यटकांचे आकर्षण असलेल्या दुधी तलावात मनमुराद बोटिंगचा अनुभव घेता यावा यासाठी या ठिकाणी अनेक सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत.
राधानगरी, भुदरगड, आजरा आणि चंदगड परिसरातील धबधबे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहेत.
भुदरगड तालुक्यातील गारगोटीपासून सुमारे १५ ते २० किलोमीटर अंतरावर वाकीघोल मार्गालगत नितवडे व खेडगे गावांच्या हद्दीत असलेला सवतकडा धबधबा हा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक मानला जात आहे. रविवारी सकाळपासून उन्हाचा कडाका असला तरी सकाळ व संध्याकाळचे आल्हाददायक वातावरण आणि धबधब्याचे आकर्षण यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
घनदाट जंगलातून धबधब्याकडे जाणारी चिखलमय वाट, वाटेतील मनमोहक सागवानाचे जंगल असा एक किलोमीटरचा थ्रील अनुभवल्यानंतर दर्शन घडते ते डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या सवतकडा धबधब्याचे. घनदाट जंगलातून वाहणारा हा धबधबा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र याच धबधब्याजवळ एकाच वाटेवर आणखी पाच धबधबे आहेत. त्यामुळे निसर्गाने पर्यटकांसाठी दिलेली ही जणू धबधब्यांची रांगच आहे. येथे सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्याने नितवडे, दोनवडे, खेडगे गावातील धबधब्यांची रांग सुरक्षित वर्षा पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे.
पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक हॉटेल्स, रिसॉर्ट्स, ढाबे, चिक्की विक्रेते, चहाचे स्टॉल तसेच इतर लहान व्यावसायिकांच्या व्यवसायाला मोठी चालना मिळत आहे. पर्यटनामुळे स्थानिक अर्थकारणाला बळ मिळत आहे.













