रेवंडी भेरेवाडी तिठा येथे भीषण अपघात 

डंपरचे चाक पायावरून गेल्याने युवक गंभीर जखमी : अनधिकृत वाळू वाहतूक प्रश्नी ग्रामस्थांचा संताप 

मालवण | प्रतिनिधी : मालवण आचरा मार्गांवर रेवंडी-भेरेवाडी तिठ्यावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात कोळंब खालचीवाडी येथील कुणाल महादेव पराडकर (२९) हा युवक गंभीर जखमी झाला. त्याच्या पायावरून डंपरचे चाक गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुणाल याला तातडीने ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले असून अधिक उपचारासाठी खाजगी रूग्णालयात नेण्यात आले होते. यावेळी रूग्णालय परिसरात कोळंब ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, (एमएच ०७ एपी-५२७८) क्रमांकाच्या अॅक्टिव्हावरून कुणाल पराडकर हा कोळंब येथून आचराच्या दिशेने जात होता. रेवंडी रोडवरून बाहेर येत असताना समोरून येणाऱ्या (जीए-०९ एल-४९६६) क्रमांकाच्या डंपरची त्याच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. धडकेनंतर युवक रस्त्यावर कोसळला आणि डंपरचे चाक त्याच्या पायावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. डंपरखाली अडकलेल्या युवकाला रोहन आचरेकर, सिद्धेश कोजरेकर यांनी बाहेर काढले. त्यांच्या धाडसामुळे जखमी युवकाला तातडीने उपचारासाठी हलविणे शक्य झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती जगताप, ऋषाली पाटील, सुहास पांचाळ, जनार्दन रेवंडकर, अजय येरम आदी अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

 

दरम्यान, डंपर चालक प्रशांत नागप्पा बिरालदनी (विजापूर) याच्याविरोधात संतप्त ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. अपघाताची माहिती समजताच कोळंब, कांदळगाव, रेवंडी तसेच परिसरातील शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. संतप्त नागरिकांनी बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

 

ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून तातडीने कारवाई करण्यास सुरूवात करण्यात आली. महसूल विभागानेही दंडात्मक कारवाई करण्याच्या हाललाची सुरू केल्या होत्या. पोलीसांनी डंपर चालक व डंपर पोलीस स्थानक परिसरात नेला.पुढील कार्यवाही सुरु होती.