देवगड तालुका आत्मा शेतकरी सल्ला समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद देवधर यांची निवड

देवगड (प्रतिनिधी) :     तालुका कृषी अधिकारी कार्यालय, देवगड येथे सोमवारी आत्मा अंतर्गत तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समितीची सभा उत्साहात पार पडली.

यावेळी समितीच्या अध्यक्षपदी श्री. प्रसाद देवधर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

सभेनंतर आत्मा अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी मंजूर कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. खरीप हंगामात भात पिकाच्या कृषी प्रात्यक्षिकासाठी रत्नागिरी-८ या सुधारित वाणाचे बियाणे ७० शेतकऱ्यांना वितरित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच आत्मा योजनेअंतर्गत लवकरच मिरीच्या रोपांचेही वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सभेस पंचायत समिती देवगडचे सभापती श्री. गणेश राणे, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग महिला व बालविकास सभापती श्रीमती अनुराधा नारकर, जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सावी लोके, श्रीमती अनवी तेली, श्रीमती संयोगी घाडी, श्री. सुनील पारकर, श्री. देवदत्त कदम तसेच शेतकरी सल्ला समितीचे सदस्य उपस्थित होते. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक तथा सदस्य सचिव श्री. निकेतन राणे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व आत्मा मंजूर कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.

नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. प्रसाद देवधर यांनी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मत्स्य व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्यासह निवडीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. “आत्मा ही संस्था तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवून शासनाच्या कृषी योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.