खेड-दापोली मार्गावर दुर्दैवी अपघात; दुचाकी घसरून नाल्यात कोसळली, २२ वर्षीय युवतीचा मृत्यू

दापोली/रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-दापोली मार्गावर आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. वाकवली-शिरशिंगे फाट्याजवळ दुचाकी घसरून रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळल्याने २२ वर्षीय युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तिच्यासोबत असलेली दुसरी युवती किरकोळ जखमी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात दाखल करून तत्परता दाखवली.
आज सकाळी साडेआठच्या सुमारास सेजल पांडुरंग भागवत आणि वैष्णवी चंद्रकांत आयरे या दोघी दुचाकीवरून दापोलीहून खेडच्या दिशेने येत होत्या. वाकवली-शिरशिंगे फाट्याजवळ आल्यानंतर दुचाकी अचानक घसरल्याने दोघीही दुचाकीसह रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळल्या. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत दापोली पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेची वाट न पाहता दोन्ही जखमी युवतींना स्वतःच्या वाहनातून दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, टेटवली-खुटाचा कोंड येथील मूळ रहिवासी आणि सध्या दापोलीतील विद्यापीठ चाळ येथे वास्तव्यास असलेल्या २२ वर्षीय सेजल पांडुरंग भागवत हिला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर नाल्यात पडल्यामुळे तिच्या नाक-तोंडात पाणी गेल्याने तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या अपघातात वैष्णवी चंद्रकांत आयरे हिला किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे भागवत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दापोली शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत.