गुहागर/ प्रतिनिधी:
जातीवरून अपमानास्पद बोलून शिवीगाळ आणि मारहाण करीत घरात घुसून मारहाण करण्याची धमकी दिल्या प्रकरणी मार्गताम्हाने येथील आदित्य सावंत आणि मुंढर येथील दीप शिर्के व जीत शिर्के या तिघांविरोधात गुहागर पोलीस स्थानकात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास बियरची बाटली घेऊन गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील राजलक्ष्मी टॉकीजचे पाठीमागील बाजूस असलेल्या पडक्या घराची बाहेरील बाजूस बियर पीत असताना दीप शिर्के व जीत शिर्के यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना मारण्यासाठी अंगावर धावत जाऊन शिवीगाळ करून धमकी दिली.
तसेच आदित्य सावंत याने त्याच्या हातातील जाड लाकडी काठीने फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करून फिर्यादी यांचा एका हाताने गळा पकडून जातीवाचक शिवीगाळ करुन धमकी दिली. तसेच साक्षीदार रोशन धामणे याला घरात जाऊन मारू अशी धमकी दिली. त्याचबरोबर तिन्ही आरोपी यांनी फिर्यादी यांना जातीवरून अपमानास्पद बोलून शिवीगाळी करून धमकी दिल्याची तक्रार दाखल करून रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.











