बुधवळे परिसरात रानगवा व वानरांचा उपद्रव!

 ▪️वनक्षेत्रपाल चेतन पाटील यांनी भेट देऊन साधला ग्रामस्थांशी संवाद

▪️वनविभागाकडून नुकसानीची पाहणी.

मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्यातील बुधवळे परिसरात वन्यप्राणी रानगवा,वानर यांच्याकड़ून होणाऱ्या पिकांच्या नुकसानी बाबत व वन्य प्राण्यांच्या लोकवस्ती जवळ वावराबाबत वनक्षेत्रपाल कुडाळ श्री. चेतन पाटील यानी ग्रामस्थांची भेट घेत मार्गदर्शन केले. श्री.समीर मुनगेकर यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने परिमंडळ मालवण मधील मौजे बुधवळे मळेशेतवाडी येथे उपवन संरक्षक सावंतवाडी श्री मिलिश शर्मा, सहा. वनसंरक्षक सावंतवाडी डॉ. सुनील लाड यांचे मार्गदर्शना नुसार अधिनस्त स्टाफ समवेत श्री पाटील यानी तात्काळ सदर नुकसानग्रस्त परिसरात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. विठ्ठल मंदिर बुधवळे याठिकाणी बुधवळे पंचक्रोशीतील उपस्थित शेतकरी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांसोबत चर्चा करून शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांद्वारे होणाऱ्या नुकसान भरपाई बाबत आवश्यक कागदपत्रे व कार्यवाही बाबत सविस्तर मार्गदर्शन केले व नुकसान भरपाई मिळवून देणे बाबत आश्वासित केले आहे. वन्यजीव संरक्षण व वन्यप्राण्यांपासून सुरक्षितेकामी घ्यावयाची खबरदारी या बाबत माहिती देण्यात आली आहे. श्री. चेतन पाटील यांनी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे व अप्रिय घटना रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

वनाधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन मार्गदर्शन केल्याबाबत शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून श्री. समीर मुणगेकर यांनी वनविभागाचे आभार मानले.यावेळी सरपंच श्री. पानवलकर, श्री. समीर मुणगेकर, श्री. परुळेकर,वनपाल मालवण श्री.सदानंद परब,वनरक्षक धामापुर श्री.अतुल खोत,वनरक्षक कांदळगाव श्री.लक्ष्मण आमले RRT कुडाळ व मालवण चे सदस्य,ग्रामपंचायत बुधवळे सदस्य, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.