देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील आंगवली विकास मंडळ मुंबई संचलित, ‘जनता विद्यालय आंगवली’ या प्रशालेमध्ये बुधवारी ‘रानभाजी महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन ‘सृष्टीज्ञान संस्था मुंबई’ आणि ‘जनता विद्यालय आंगवली’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना स्थानिक जैवविविधता, पारंपरिक आहार आणि रानभाज्यांचे पौष्टिक व औषधी महत्त्व समजावे या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांनी युक्त असे पदार्थ बनविले होते. विद्यार्थ्यांनी प्रत्येक रानभाजीची ओळख, तिचे पौष्टिक मूल्य, औषधी गुणधर्म आणि पारंपरिक पाककृती यांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी विद्यार्थ्यां मध्ये रानभाज्यांविषयीची जनजागृती करण्यात आली. आजची तरूण पिढी फास्ट फूड कङे जास्त प्रमाणात आकर्षित होत आहे. अशा वेळी नैसर्गिक पोषणमूल्यांनी परिपूर्ण असणाऱ्या रानभाज्या आहारातील महत्त्वपूर्ण भाग ठरतात. या प्रसंगी मान्यवरांनी रानभाज्या या आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा वारसा असून आरोग्यदायी जीवनासाठी त्यांचा आहारात नियमित समावेश करण्याचे आवाहन केले.
महोत्सवाला उपस्थित असणारे नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. अशोकजी अणेराव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या महोत्सवाला महाराष्ट्र जनुकीय कोष प्रकल्पा अंतर्गत कार्यरत असणारे व रानभाज्या संवर्धन कार्यामध्ये कार्यशील असणारे मा. श्री. आतिश माईनकर सर, तसेच सह्याद्री संकल्प सोसायटी या प्रसिद्ध संस्थेचे सदस्य आणि ‘बीज संग्रहालय’ या प्रकल्पा अंतर्गत बीज महत्व यावर कृतिशील असणारे मा. श्री. अभिजीत पाटील सर, आणि त्यांच्याच क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अलीया रामास्वामी मॅडम हे प्रमुख मान्यवर परीक्षक म्हणून लाभले. याप्रसंगी संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, प्रशालेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.












