दापोली:
दापोली तालुक्यातील केळशी येथे अडखळ बौद्धवाडीजवळ डंपर रस्त्याच्या मऊ पडलेल्या साईडपट्टीच्या मातीत फसून पलटी झाल्याने चालकाचा डंपरखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला. नवनीत नरेश भिसे (वय ३०, रा. केळशी, ता. दापोली) असे मृत चालकाचे नाव आहे. ही घटना ६ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानदेव कैलास चुनेकर व चालक नवनीत भिसे हे दोघे आयशर डंपर (क्रमांक MH 08 AP 6668) मधून खडी रिकामी करून केळशीच्या दिशेने येत होते. अडखळ बौद्धवाडी येथे आले असता, रस्त्याच्या कडेला चिखल आणि मऊ मातीमुळे डंपरचे टायर फसले. टायर बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना गाडी कुठपर्यंत फसली आहे हे पाहण्यासाठी चालक नवनीत भिसे आणि ज्ञानदेव चुनेकर गाडीतून खाली उतरले.
चालक नवनीत हे ड्रायव्हर बाजूने (उजव्या बाजूने) खाली उतरत असतानाच चिखलात फसलेला डंपर अचानक उजव्या बाजूला पलटी झाला. यामध्ये नवनीत भिसे हे डंपरखाली अडकले.
या घटनेनंतर डंपर मालक मिथुन प्रकाश चिंचघरकर (रा. कवडौली) यांनी तातडीने जेसीबी मागवून डंपर बाजूला केला आणि नवनीत यांना बाहेर काढले. रुग्णवाहिकेतून त्यांना उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.












