खेड (प्रतिनिधी) : नुकत्याच जाहीर झालेल्या चौथी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात आंबवली प्रभागातील जिल्हा परिषद शाळा सणघर चाटव या दुर्गम भागातील शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा विद्यार्थी अर्णव अभिजीत मोरे याने जिल्हा गुणवत्ता यादीत ७१वे स्थान मिळवत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.
याच शाळेतील विद्यार्थिनी शनाया चंद्रकांत मोरे हिनेही चौथी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होत शाळेच्या यशात भर घातली. विशेष म्हणजे, शाळेचा चौथी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून, शाळेने प्रथमच असे उज्ज्वल यश मिळवले आहे.
या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक बबन राजाराम साळवी यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक समिती शाखा खेडचे तालुका नेते म्हणून संघटनात्मक जबाबदारी सांभाळतानाच साळवी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत हे उल्लेखनीय यश मिळवले आहे.
दुर्गम भागातील शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेले हे यश विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठीही अभिमानाची बाब ठरली आहे. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बाबुराव मोरे आणि उपाध्यक्ष शुभांगी जगन्नाथ मोरे यांनी यशस्वी विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
सणघर चाटव शाळेच्या या उज्ज्वल कामगिरीचे अठरा गाव धवडे-बांदरपट्टी परिसरातून विशेष कौतुक होत असून, ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमधूनही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची उत्कृष्ट उदाहरणे निर्माण होऊ शकतात, हे या यशातून अधोरेखित झाले आहे.













