प्रतिकूल परिस्थितीवर मात करत निवेबुद्रुकच्या ऋतुजा चव्हाणचे “बी. एस्सी. फॉरेन्सिक सायन्स” पदवी शिक्षणात सुयश

महाराष्ट्र बोर्डात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत नव्या पिढीसमोर ठेवला आदर्श

देवरूख (प्रतिनिधी):

लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत नाजूक होती .. तशाही परिस्थीतीत देखील आईने खचून न जाता दिलेला भक्कम आधार यामुळे पुढे शिकण्याची जिद्द मिळाली आणि पुढे त्यात मोठ्या जिद्दीने यशही मिळविले. ही “सक्सेस स्टोरी” आहे. संगमेश्वर तालुक्यातील निवेबुद्रुक गावातील ऋतूजा रवींद्र चव्हाण या मुलीची.

ऋतुजा चव्हाण हिने “बी.एस्सी. फॉरेन्सिक सायन्स” पदवीमध्ये ८५.८८ टक्के गुण मिळवत महाराष्ट्र बोर्डात प्रथम श्रेणी मिळविण्याबरोबर महाविद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त करत विशेष प्राविण्य मिळवले आहे. कठीण परिस्थितीत जिद्द व चिकाटीने ऋतूजाने घेललेली ही मेहनत आणि त्यातून आईच्या कष्टाचे केलेले चीज ही बाब नक्कीच आजच्या नव्या पिढीसमोर आदर्शवत ठरणारी आहे. लहानपणीच वडिलांचें मायेचे छत्र हरपल्याने घरी ऋतुजासह तिची वयोवृद्ध आजी, भाऊ या सर्वांची जबाबदारी आईवर आली होती. मात्र अशा परिस्थितही न खचता न डगमगता, प्रसंगी मोलमजुरी करून सर्वांच्या पाठी खंबीर उभी राहून तिने आपल्या दोन्हीही मुलांना पाठबळ दिले. आईच्या भक्कम आधारामुळे ऋतूजाला पुढे शिकण्याचे बळ मिळाले.

ऋतुजाचे प्राथमिक शिक्षण देवरुख नं. २ या शाळेत झाले. पुढे ४ थी ते ७ वी निवे जि. प.मराठी शाळा, ८ वी ते १०वी तुळसणी विद्यालय, ११ वी ते १२ वीचे शिक्षण आठल्ये सप्रे पित्रे कॉलेज देवरुख येथे झाले. त्यानंतर पुढे शिकण्याची इच्छा होती. मात्र घरची स्थिती बेताची असल्याने मोठा भाऊ याने जॉबसाठी मुंबई गाठली. त्यापाठोपाठ ऋतुजा ही सुद्धा आपले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवी मुंबई येथे गेली. कॉलेज करत असता असता फावल्या वेळात ती जॉब करू लागली आणि आपल्या शिक्षणाचा खर्च करू लागली आणि त्यातूनच ऋतुजाने पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशन अँड रिसर्च, कॉलेज,नवीमुंबई येथे “बी.एस्सी. फॉरेन्सिक सायन्स” पदवीचे शिक्षण सुरु केले.

मोठ्या जिद्दीने ते तिने शिक्षण पूर्ण करत नुकतेच त्यात उज्वल यश संपादन केले आहे. तिची शिक्षणासाठीची धडपड पाहून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि वशिष्टी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी तिला शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य केले. त्यांनी दिलेले हे प्रोत्साहन आणि आपल्या आईचे कष्ट, भावाची उत्तम साथ व पाठबळ यामुळे आपण हे यश प्राप्त करु शकलो असल्याचे मत ऋतुजाने व्यक्त केले आहे. ऋतुजाच्या या यशामुळे तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर परिस्थितीवर मात करून तिने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे, अशी भावना यावेळी व्यक्त होत आहे.