दरवर्षी १४ ऑगस्टला तिरंगा पदयात्रा आणि १५ ऑगस्टला माजी सैनिकांचा गौरव होणार : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची घोषणा
रत्नागिरी (प्रतिनिधी):
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत रत्नागिरी शहरामध्ये १४ ऑगस्ट रोजी भव्य आणि अभूतपूर्व अशा ‘तिरंगा पदयात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. अवघ्या ७२ तासांच्या नियोजनात १० हजारांहून अधिक नागरिक, विद्यार्थी आणि युवक या पदयात्रेत सहभागी झाल्याने संपूर्ण रत्नागिरी शहर अक्षरशः ‘तिरंगामय’ झाले होते. जात-धर्म आणि वयाची बंधने विसरून लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच हातात तिरंगा घेऊन देशाप्रती असलेला आपला अभिमान आणि राष्ट्रप्रेम यावेळी व्यक्त केले.
छत्रपती शिवरायांना अभिवादन करून पदयात्रेची सुरुवात
शहरातील मारुती मंदिर चौक येथून या भव्य पदयात्रेची सुरुवात झाली. सुरुवातीला रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत आणि राज्यगीत वाजवून वातावरणात देशभक्तीचे स्फुरण भरले.
त्यानंतर ही भव्य पदयात्रा मारुती मंदिर चौकातून जयस्तंभ चौकाकडे मार्गस्थ झाली. जयस्तंभ येथे पोहोचल्यानंतर जयस्तंभाला पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना वंदन करण्यात आले.
मान्यवर आणि विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती
या ऐतिहासिक पदयात्रेत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनोज जिंदल, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी आणि विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या महत्त्वाच्या घोषणा
जयस्तंभ येथे पदयात्रेचा समारोप झाल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले,
“नागरिकांनी दिलेला हा प्रचंड प्रतिसाद म्हणजे प्रत्येकाच्या मनात वसलेले देशाप्रतीचे असीम प्रेम आहे. अवघ्या ७२ तासांच्या आवाहनावर १० हजारांपेक्षा जास्त रत्नागिरीकरांनी दाखवलेला हा उत्साह कौतुकास्पद आहे.”
यावेळी त्यांनी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या
त्यामध्ये रत्नागिरी शहरामध्ये दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी याच पद्धतीने भव्य ‘हर घर तिरंगा’ पदयात्रेचे आयोजन केले जाईल.
माजी सैनिकांचा सन्मान: दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी शासकीय ध्वजारोहण पार पडल्यानंतर जिल्ह्यातील माजी सैनिकांचा विशेष मेळावा आयोजित करून त्यांचा जाहीर सत्कार आणि सन्मान केला जाईल.
तसेच पुढील वर्षी अधिक व्यापक नियोजन करून १ लाखांहून अधिक नागरिकांचा सहभाग असलेली ऐतिहासिक पदयात्रा काढण्यात येईल, असा विश्वासही डॉ. सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.











