सावंतवाडी तालुका आमसभेत मूलभूत प्रश्नांवरून अधिकारी धारेवर

तब्बल नऊ वर्षांनंतर आमसभा : लोकप्रतिनिधी व नागरिकांचा प्रश्नांचा भडिमार

आरोग्य व पाणीप्रश्न ऐरणीवर : बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनाही केले लक्ष

सर्व समस्या मार्गी लावण्याचे आमदार दीपक केसरकर यांचे आश्वासन

​सावंतवाडी (प्रतिनिधी):
रस्ते, पाणी, वीज, रोजगार, बीएसएनएल नेटवर्क आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांवरून सावंतवाडी तालुक्याची आमसभा शुक्रवारी चांगलीच गाजली. तब्बल नऊ वर्षांनंतर सावंतवाडी नगरपालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. सभेदरम्यान लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. प्रत्येक प्रश्नावर अधिकाऱ्यांची उजळणी घेत सर्व समस्या कालबद्ध मर्यादेत मार्गी लावल्या जातील आणि वेळ पडल्यास मंत्र्यांसोबत बैठक बोलावून तोडगा काढला जाईल, असे आश्वासन आमदार दीपक केसरकर यांनी दिले.

​तब्बल नऊ वर्षानंतर सावंतवाडी तालुका पंचायत समितीची आमसभा येथील बॅरिस्टर नाथपाई सभागृहात पार पडली. सभेच्या प्रारंभीच भाजपचे पदाधिकारी चंद्रकांत जाधव यांच्या मागणीनुसार सभागृहात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पुढील सभेपूर्वी लावण्याचे आदेश आमदारांनी दिले. यानंतर तालुक्यातील रस्ते आणि पुलांच्या कामांचा मुद्दा चांगलाच तापला. माजी सभापती पंकज पेडणेकर यांनी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील अपूर्ण रस्त्यांचा प्रश्न मांडला, तर अभय कीनळोसकर यांनी सांगेली घोलेवाडी अरुंद पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली. धवडकी-शिरशिंगे-गोठवेवाडी रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न माजी सभापती रवी मडगावकर यांनी उपस्थित केला. या रस्त्यासाठी २५ कोटींचा निधी मंजूर असून वर्क ऑर्डर झाली आहे, मात्र वनविभागामुळे काम अडकल्याची माहिती कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी दिली. यावर वनविभागाच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन केसरकर यांनी दिले.

​नाणोस येथील दोन कोटींच्या पुलाला तडे गेल्याची गंभीर तक्रार सामाजिक कार्यकर्ते सागर नाणोसकर यांनी केली. यावर तज्ज्ञांची टीम पाठवून पुलाची डागडुजी केली जाईल आणि कंत्राटदारावर कारवाई सुरू असल्याचे पूजा इंगवले यांनी सांगताच, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी अधिकाऱ्यांनी चुकीच्या कामांना व कंत्राटदारांना पाठीशी घालू नये, अशा शब्दांत सुनावले.

याशिवाय बांदा-पात्रादेवी रस्त्याची दुरवस्था आणि शहरातील खड्डे व नळ-गॅस वाहिनीच्या खोदाईबाबत साई काणेकर आणि निशांत तोरसकर यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर पावसानंतर लगेचच डांबरीकरण केले जाईल, असे आमदारांनी स्पष्ट केले.

​आरोग्य, पाणी आणि रोजगाराच्या मुद्द्यांवरही सभेत जोरदार चर्चा झाली. पंढरीनाथ राऊळ यांनी शिरशिंगे व देवसू धरणांचे थांबलेले काम आणि सांगेली आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी डॉक्टर देण्याची मागणी केली. यावर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी डॉक्टर लवकरच हजर होतील असे सांगत देवसू ग्रामसचिवालायासाठी १० लाख रुपयांचा निधी जाहीर केला.

कोलगावच्या पाण्याचा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी मांडला. तर सातार्डा येथील उत्तम स्टील रस्त दुरुस्ती आणि स्थानिक तरुणांना रोजगारासाठी गोव्यात जावे लागत असल्याने एमआयडीसी आणण्याची मागणी पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ते यांनी केली. यावर उद्योगमंत्र्यांशी बोलून एमआयडीसी आणू, असे आश्वासन केसरकर यांनी दिले. डेटा सेंटर व ५०० युवकांच्या रोजगाराबाबत ॲड. तेजस परब यांनी विचारणा केली.

​प्रस्तावित प्रदूषणकारी मायनिंग प्रकल्प आणि शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा गजानन गायतोंडे व संदीप सावंत यांनी उपस्थित केला. यावर लोकांना नको असल्यास मायनिंग प्रकल्पाला आपलाही विरोध राहील, तसेच शक्तीपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून नव्याने सर्व्हे करण्याचे आश्वासन मिळाले असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.

रेल्वे टर्मिनस येथे नवीन गाड्या सुरू केल्याबद्दल कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहिर मठकर यांनी आमदार दीपक केसरकर व खासदार नारायण राणे यांचे विशेष अभिनंदन केले.

यावेळी ​व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, शिक्षण-आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी निलेश जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, नगराध्यक्ष श्रद्धा भोसले, उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब तसेच सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य व नगरसेवक उपस्थित होते.

सावंतवाडी तालुक्याच्या आरोग्याचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार : आ. दीपक केसरकर

आमसभेत प्रामुख्याने सावंतवाडी तालुका आणि परिसरातील आरोग्य सुविधांचा दर्जा सुधारणे तसेच प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावणे या विषयांवर लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. ​सभेदरम्यान आरोग्य समितीचे अध्यक्ष एन. बी. रेडकर यांनी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे आणि डॉक्टरांच्या उपलब्धतेबाबत प्रशासनाचे लक्ष वेधत आरोग्य व्यवस्थेतील विविध समस्या मांडल्या. या विषयावर चर्चा सुरू असताना उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये काही काळ वैचारिक मतभेद व बाचाबाच निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत मध्यस्थी केली तसेच आमदार दीपक केसरकर यांनी सर्वांना शांत राहून सनदशीर मार्गाने व सकारात्मकतेने प्रश्न सोडवण्याचे आवाहन केल्यानंतर वातावरण तात्काळ शांत झाले.

​उपस्थित लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले की, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचा कोल्हापूर विभागात दुसरा क्रमांक आला असून तेथील आरोग्य कर्मचारी चांगले काम करत आहेत. रुग्णालयातील रिक्त असलेली डॉक्टरांची पदे येत्या काही दिवसांत भरली जातील. तसेच स्थानिक आरोग्याबाबतच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी याच ठिकाणी लवकरच एक विशेष बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

​तसेच बहुप्रतिक्षित मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाबाबत बोलताना आमदार केसरकर यांनी स्पष्ट केले की, या प्रकल्पाचे ८५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार असून ते प्रशासनाकडे सादर केले जाईल. यासंदर्भातील न्यायालयाचा निर्णय लवकरच अपेक्षित असून जागेचा प्रश्न सुटून मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा मार्ग मोकळा होईल. सोबतच सावंतवाडीत ‘आयुष ओपीडी’ सुरू होत असल्याने नागरिकांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळतील. वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी मांडलेल्या सूचनेची दखल घेत त्यांनी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांना उच्च रक्तदाबाच्या रुग्णांवर स्थानिक पातळीवरच योग्य उपचार होतील याकडे वैयक्तिक लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.