जामसंडे वेळवाडी अंगणवाडीच्या छप्पराचे वानरांकडून नुकसान; मुलांना पावसाचा त्रास
जामसंडे : जामसंडे वेळवाडी येथील अंगणवाडीमध्ये आज सकाळी वानराने धुडगूस घालत अंगणवाडीच्या छप्पराचे नुकसान केले. छप्पराचे नुकसान झाल्याने पावसाचे पाणी अंगणवाडीमध्ये येत होते. त्यामुळे अंगणवाडीतील लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागला.
याबाबत अंगणवाडी सेविकेने स्थानिक नगरसेविका तथा पाणीपुरवठा सभापती सौ. तन्वी चांदोस्कर यांना माहिती दिली. माहिती मिळताच त्यांनी तातडीने अंगणवाडीची पाहणी केली. परिस्थितीची तातडी लक्षात घेऊन त्यांनी ताडपत्री उपलब्ध करून देत नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून छप्परावर ताडपत्री बसवून घेतली.
अंगणवाडीच्या छप्पराची कायमस्वरूपी दुरुस्ती लवकरच करून घेण्यात येणार आहे. तसेच जिल्हा नियोजन समिती २०२५-२६ अंतर्गत सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून ₹२,५०,००० निधी मंजूर झाला असून, या निधीतून आवश्यक दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.
तातडीने उपाययोजना करून अंगणवाडीतील मुलांना दिलासा मिळवून दिल्याबद्दल पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.












