अजिंक्य कोतमिरे यांची मालवण गटशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती 

उच्चशिक्षित, अभ्यासू व कार्यक्षम अधिकारी 

मालवण | प्रतिनिधी : मालवण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारीपदी अजिंक्य रविंद्र कोतमिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उच्चशिक्षित, अभ्यासू आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेल्या अजिंक्य कोतमिरे यांच्या नियुक्तीमुळे मालवण तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राला सक्षम व प्रभावी नेतृत्व मिळाले आहे.

 

अजिंक्य कोतमिरे यांचे मूळ गाव सातवे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर आहे. त्यांचे प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतून बी.ई. पदवी प्राप्त केली.

 

शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची आवड तसेच प्रशासकीय सेवेत योगदान देण्याच्या उद्देशाने त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेची तयारी केली. MPSC राज्यसेवा परीक्षा २०२२ मधून त्यांची उपशिक्षणाधिकारीपदी निवड झाली. त्यानंतर आता त्यांची मालवण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

अभियांत्रिकीसारख्या तांत्रिक शाखेतील उच्च शिक्षण, MPSC राज्यसेवेतील यश आणि शिक्षण विभागातील प्रशासकीय जबाबदारी यामुळे अजिंक्य कोतमिरे यांच्या रूपाने मालवण तालुक्याला उच्चशिक्षित, अभ्यासू व कार्यक्षम अधिकारी लाभले आहेत. त्यांच्या नियुक्तीचे शैक्षणिक क्षेत्रातून स्वागत होत असून, त्यांच्या कार्यकाळात मालवण तालुक्यातील शिक्षण व्यवस्था अधिक गतिमान, गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक होण्यास निश्चितच मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.