महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर गव्हर्निंग कौन्सिलवर युवा उद्योजक संग्राम साळसकर यांची ‘स्वीकृत सदस्य’ नियुक्ती

महाराष्ट्रात व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी योगदानाची संधी

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग, कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर (MACCIA) च्या गव्हर्निंग कौन्सिलवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील महान गावचे युवा उद्योजक संग्राम साळसकर यांची ‘स्वीकृत सदस्य’ (Co-opted Member) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या २०२६-२०२८ या कार्यकाळासाठी त्यांची ही नियुक्ती झाली आहे.

 

महाराष्ट्र चेंबरची नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली असून, त्यानंतर गव्हर्निंग कौन्सिलची रचना करण्यात आली. या पार्श्वभूमीवर संग्राम साळसकर यांची गव्हर्निंग कौन्सिलवर स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाल्याचे अधिकृत पत्र महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी दिले आहे.

 

गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य म्हणून साळसकर हे महाराष्ट्र चेंबरच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणार असून, व्यापार, उद्योग, कृषी उद्योग तसेच सेवा क्षेत्राच्या विकासासाठी संस्थेच्या माध्यमातून योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा लाभ चेंबरच्या आगामी कार्यकाळात संस्थेच्या विविध उपक्रमांना मिळणार आहे.

 

महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांच्या विविध प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, उद्योग क्षेत्राच्या विकासाला चालना देणे तसेच व्यापार व उद्योगाशी संबंधित विषयांवर प्रभावीपणे काम करणे, या दृष्टीने महाराष्ट्र चेंबरची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. अशा प्रतिष्ठित संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलवर संग्राम साळसकर यांची नियुक्ती झाल्याने मालवणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 

संग्राम साळसकर यांच्या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी प्रभावी योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी संग्राम साळसकर यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या असून, संस्थेच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवत मोलाचे योगदान देण्याचे आवाहन केले आहे.