दापोली (विशेष प्रतिनिधी) : कामावर घेत नसल्याच्या कारणातून ई-शिवाई कर्मचारी प्रथमेश केळकर यांनी फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना दापोलीत घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रथमेश केळकर हे ई-शिवाई बसचे चालक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, त्यांना कामावर घेतले जात नसल्याने ते नाराज होते. याच कारणातून त्यांनी फिनाईल प्राशन करून टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
फिनाईल प्राशन केल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
दरम्यान, कामावर न घेतल्याच्या कारणातून ई-शिवाई कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या या घटनेमुळे ई-शिवाई कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा आणि कामकाजाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संबंधित कर्मचाऱ्याला कामावर का घेतले जात नव्हते, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या घटनेप्रकरणी संबंधित प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळणे बाकी असून, प्रथमेश केळकर यांच्या प्रकृतीबाबतही पुढील वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे.












