परुळे येथे ‘शाळा आठवणीतील ग्रुप’तर्फे भव्य गणपती सजावट स्पर्धा…

परुळे : प्रतिनिधी
पर्यावरणपूरक सजावटीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘शाळा आठवणीतील ग्रुप – परुळे’ यांच्या वतीने ‘भव्य गणपती सजावट स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा केवळ परुळे ग्रामपंचायत हद्दीपुरती मर्यादित राहणार आहे.

स्पर्धेत गणपतीची मूर्ती मातीची असणे आवश्यक असून, सजावटीमध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्लास्टिक, थर्माकोल, पी.ओ.पी. व प्लास्टिक फुलांचा वापर टाळणे, सजावटीमध्ये पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर करणे, तसेच स्वच्छता, कल्पकता व पर्यावरणपूरकता यांना विशेष महत्त्व दिले जाणार आहे. धार्मिक भावना व सामाजिक सलोखा जपत सजावट करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १ हजार ५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच प्रमाणपत्रेही प्रदान करण्यात येणार आहेत.

स्पर्धेत प्रवेश निश्चित करण्यासाठी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वांना बंधनकारक राहणार आहे. स्पर्धेतील सजावटीचे परीक्षण पर्यावरणपूरक सजावट, कल्पकता व नावीन्य, सजावटीची आकर्षकता, पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर आणि स्वच्छता व एकूण मांडणी या निकषांवर केले जाणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अधिक माहितीसाठी सिद्धिदिनायक तेली (९२७२१०६५९९), अमित तेली (९४०४७४८८३३), भाऊ मांजरेकर (९३२२४४७५४४) व बबलू शिरसाट (७४४७६६९९००) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

“पर्यावरणपूरक सजावट… सुंदर पर्यावरण, हरित भविष्यासाठी एक पाऊल!” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला परुळे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन ‘शाळा आठवणीतील ग्रुप’तर्फे करण्यात आले आहे.