प्रशासनाकडून योग्य भूमिकेची अपेक्षा ; आवश्यक कारवाई होईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद संकुलातील गाळ्यांच्या हस्तांतरण व वापराबद्दल निर्माण झालेल्या वादावर कायदेशीर मार्ग निघावा आणि प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते श्रेयश मुंज यांनी नगरपरिषद सभागृहाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई होईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून, प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
नगरपरिषद संकुलातील काही गाळे नियमांचे उल्लंघन करून हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप करत श्रेयश मुंज यांनी गेल्या काही दिवसांपासून या विषयाकडे लक्ष वेधले होते. स्वातंत्र्यदिनी त्यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने खबरदारी म्हणून ते गाळे सील केले होते. मात्र, त्यानंतर कोणताही अंतिम निर्णय न होता हे गाळे पुन्हा उघडून वापर सुरू करण्यात आल्याचा दावा मुंज यांनी केला आहे.
या प्रक्रियेत पारदर्शकता राहावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी, या मागणीसाठी त्यांनी अर्धनग्न अवस्थेत सभागृहाच्या बाहेर बसून आपले आंदोलन सुरू ठेवले आहे. या आंदोलनाची दखल घेत नगरपरिषदेच्या बैठकीदरम्यान मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी स्वतः मुंज यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनीही सभागृहातून बाहेर येत या विषयाची संपूर्ण माहिती घेतली आणि वस्तुस्थिती जाणून घेतली.
लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दाखवलेल्या या तत्परतेमुळे या गुंतागुंतीच्या प्रश्नावर लवकरच सुयोग्य आणि कायदेशीर तोडगा निघेल, अशी आशा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. आता या संवेदनशील विषयावर नगरपरिषद प्रशासन कोणती सकारात्मक आणि ठोस भूमिका घेते, याकडे संपूर्ण सावंतवाडी शहराचे लक्ष लागले आहे.













