सावंतवाडी नगरपरिषद मासिक बैठकीत शहर विकासाच्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा
सावंतवाडी : सावंतवाडी नगर परिषदेची मासिक बैठक आज पुन्हा एकदा पाणीपुरवठा विषयावरून गाजली. नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली. केवळ कर्मचाऱ्यांपुरती कारवाई मर्यादित न ठेवता या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन दोषी व्यक्तींची जबाबदारी निश्चित करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावरील चर्चेनंतर नगराध्यक्ष सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी प्रशासनातील पारदर्शकता आणि शहरहिताला प्राधान्य देत दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या मासिक बैठकीत शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, व्यापारी गाळे, कचरा व्यवस्थापन, सीसीटीव्ही, तलाव संवर्धन तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांबरोबरच शहराच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर सकारात्मक भूमिका घेण्यात आली. लोकमान्य टिळक सभागृहात नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. सभेच्या सुरुवातीला ठराव व टिप्पणी वाचनावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये चर्चा झाली. नगराध्यक्षांनी हस्तक्षेप करून विषयावर तोडगा काढल्यानंतर सभेचे कामकाज सुरळीतपणे पुढे सुरू झाले.
पाणीपुरवठा विभागातील आर्थिक व्यवहारासंदर्भात सभेत सर्वांकष चर्चा झाली. पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट करत संबंधित प्रकार निदर्शनास आल्यानंतर यापुढे कोणतेही बिल अदा करू नये, असे आदेश आपण तात्काळ दिले होते, असे सांगितले. तसेच चौकशीमध्ये प्रशासनाच्या काळात बजेटपेक्षा जास्त रकमेची बिले अदा झाल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच गहाळ झालेल्या रजिस्टरसंदर्भात तक्रार दाखल करण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना लेखी पत्र दिल्याची माहिती त्यांनी दिली.
नगरसेविका ॲड. सायली दुभाषी, शर्वरी धारगळकर आणि नगरसेवक देवेंद्र टेमकर यांनीही या विषयावर प्रशासनाकडून अहवाल तसेच गहाळ रजिस्टरबाबत पुढील कार्यवाहीची माहिती सभागृहात देण्याची मागणी केली.
या संपूर्ण चर्चेची दखल घेत नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांनी पाणीपुरवठा विभागातील प्रकरण गांभीर्याने घेतले असून संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले. सावंतवाडीला बापूसाहेब महाराजांचा वारसा लाभला असून प्रशासनातील पारदर्शकता आणि शहरहिताला प्राधान्य देत दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येचा प्रश्नही बैठकीत चर्चेला आला. नागरिकांकडून विविध ठिकाणी कुत्र्यांना अन्न दिले जात असल्याने निर्माण होणाऱ्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपालिकेने चार ठिकाणी अन्न देण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. झिरंग भाग, चिटणीस नाका परिसर, मियाँसाब समाधी परिसर आणि मोरडोंगरी परिसरात यासाठी जागा निश्चित करण्याचे नियोजन आहे. नियुक्त व्यक्तीने निश्चित केलेल्या ठिकाणीच कुत्र्यांना अन्न देण्याची व्यवस्था करण्यात येणार असून त्यासाठी नियम व अटी निश्चित केल्या जाणार आहेत.
मोरडोंगरी परिसर आपल्या प्रभागात येत असल्याने स्थानिक नागरिकांची भूमिका जाणून घेऊनच तेथे जागा निश्चित करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक अजय गोंदावळे यांनी केली. नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा त्रास होऊ नये, यासाठी योग्य नियोजनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत हरकत असल्यास नागरिकांनी ती नोंदवावी, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले.
इंदिरा गांधी व्यापारी कॉम्प्लेक्समधील गाळेधारकांच्या भाडे व प्रीमियम रकमेबाबतही बैठकीत चर्चा झाली. नगरसेवक संजीव परब यांनी गाळेभाडे तीन टप्प्यांत वसूल करण्याची मागणी केली. प्रीमियम रकमेबाबतही सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची मागणी त्यांनी केली. यावर प्रथम गाळेभाडे वसूल करून त्यानंतर प्रीमियमबाबत निर्णय घेतला जाईल. व्यापाऱ्यांकडून मागणी आल्यास त्यावर चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
शासनाच्या कचरामुक्त अभियानाच्या अनुषंगाने शहरातील विविध जीव्हीपी पॉईंटचे सुशोभीकरण करण्याबाबतही चर्चा झाली. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने संबंधितांवर कारवाई करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी नगरसेवक अजय गोंदावळे यांनी केली. शहरातील विविध भागांत सीसीटीव्ही व्यवस्था वाढविण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली असून निधी उपलब्ध झाल्यानंतर आवश्यक ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येतील, अशी माहिती नगराध्यक्षांनी दिली.
शहरातील विविध वॉटर बॉडींच्या सुशोभीकरणाबाबतही अहवालाचे वाचन करण्यात आले.
मोती तलावातील आत्महत्यांच्या घटना रोखण्यासाठी तलावाच्या काठावर रेलिंग उभारण्याची मागणी उद्यान सभापती मोहिनी मडगावकर यांनी केली. ॲड. नेता कविटकर यांनीही आत्महत्या प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली. पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी तलाव परिसरात चार जणांची टीम नियुक्त करण्याची सूचना केली. सर्व सूचनांचा विचार करून योग्य उपाययोजना करण्यात येतील, असे नगराध्यक्षांनी सांगितले.
मोती तलावातील पाण्याच्या स्वच्छतेचा मुद्दाही संजू परब यांनी उपस्थित केला. तलावात ड्रेनेजचे पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करावी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनासाठी तलावातील पाणी स्वच्छ ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली.
*सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला गती मिळणार*
सावंतवाडी शहरातील सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबत सभागृहात सकारात्मक चर्चा झाली. शासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या संबंधित ठेकेदार कंपनीला आवश्यक डीपीआर, सर्वेक्षण व अनुषंगिक कामे करण्यास मान्यता देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
मोती तलावाचे संवर्धन तसेच शहरातील सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत असताना या प्रकल्पाला प्राधान्य देऊन कामाला चालना दिल्याचे सांगितले.
प्रकल्पासाठी स्मशानभूमीच्या बाजूला जागा निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील प्रत्येक प्रभागातून या प्रकल्पाचे काम एकाच वेळी सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरातील पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन मजबूत करण्याबरोबरच स्वच्छता, तलाव संवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांना गती देण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेची मासिक बैठक महत्त्वपूर्ण ठरली.













