मुणगे येथे भातशेती मार्गदर्शन कार्यशाळेस प्रतिसाद!

▪️संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) व कृषी विभागातर्फे आयोजन 

मसुरे | झुंजार पेडणेकर : देवगड

तालुक्यातील मुणगे सावंतवाडी झरी येथे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भातशेती विषयक विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परिसरातील शेतकरी व महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या प्रसंगी कृषी तज्ज्ञांनी भातपिकावरील विविध कीड व रोग व्यवस्थापन, त्यावर करायच्या प्रभावी उपाययोजना, महिला शेतकऱ्यांची अधिकृत नोंदणी तसेच कृषी विभागाच्या ‘खत नोंदणी ॲप’च्या वापराबाबत सविस्तर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले.

कार्यक्रमप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी (कणकवली) श्री. उमाकांत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले, शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीसोबतच आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल ॲप्सचा वापर करणे काळाची गरज आहे. खत नोंदणी ॲपमुळे खतांची पारदर्शकता आणि वेळेवर उपलब्धता होण्यास मदत होईल. तसेच, भातपिकावर पडणाऱ्या किडींचे वेळेत योग्य व्यवस्थापन केले तर पिकाचे नुकसान टळून उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते. महिला शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा अधिकधिक लाभ घेण्यासाठी आपली नोंदणी त्वरित पूर्ण करावी असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी (कणकवली) श्री. उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी (देवगड) श्रीमती आरती पाटील, कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रण अधिकारी (देवगड) श्रीमती मानसी पवार, श्री. बापूसाहेब लांबाडे, श्री. वैभव मापारी, श्री. निकेतन राणे, श्रीमती नेहा पवार, मुणगे सोसायटी चेअरमन गोविंद सावंत, माजी सरपंच सौ. साक्षी गुरव, पोलीस पाटील सौ साक्षी सावंत, दादा वळंजू यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.