लांजाच्या ‘सावित्रीच्या लेकी’ ठरल्या प्रथम
वाटूळ : राजापूर तालुक्यातील ओणी येथील गजानन हॉल येथे रॅलिस कॉलेज ऑफ प्रोफेशनल स्टडीज, वाटूळ आणि रॅलिस फाउंडेशनच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त काल जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्हाभरातून आलेल्या १४ महिला संघांनी अत्यंत उत्साहात सहभाग घेतला होता.
पारंपरिक मंगळागौर खेळ,विविध सांस्कृतिक सादरीकरण आणि आकर्षक पारंपरिक वेशभूषेच्या माध्यमातून महिलांनी महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अत्यंत सुंदररीतीने सादर केली, ज्याचा उपस्थित रसिकांनी भरभरून आनंद लुटला.
अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत लांजाच्या ‘सावित्रीच्या लेकी मैत्री ग्रुप’ने प्रथम क्रमांक पटकावला,तर भांबेडच्या महालक्ष्मी महिला गट’ने द्वितीय आणि राजापूर तालुक्यातील आणसुरे येथील ‘दुर्गामाता मंगळागौरी ग्रुप’ने तृतीय क्रमांक मिळविला. सर्व विजेत्या संघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि आकर्षक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या भव्य सोहळ्याला रॅलिस फाउंडेशनचे अण्णा पवार, वाटूळ गावातील प्रमुख मानकरी बाबा चव्हाण,प्रशांत चव्हाण, शिवप्रतिष्ठानचे सुहास चव्हाण, विद्या विकास मंडळ व शालेय समितीचे चेअरमन विजय चव्हाण, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष विश्वास चव्हाण, संजय चव्हाण, मुंबई विद्यापीठाचे माजी रजिस्ट्रार अरुण चव्हाण, वृंदा चव्हाण, वीणा चव्हाण, शिवप्रतिष्ठान-संभाजी भिडे समूहाचे सचिन कदम, प्रमोद कुलकर्णी, व्हीलचेअर क्रिकेटचे अध्यक्ष गुरव सर, आदर्श विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज वाटूळचे प्राचार्य संदीप मयेकर, त्रिपाठी सर, हजारे सर आणि पोकळेकर मॅडम यांची विशेष उपस्थिती लाभली होती. स्पर्धेचे प्रामाणिक व निष्पक्ष पंच म्हणून मोरे मॅडम आणि शिंदे मॅडम यांनी जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल रॅलिस कॉलेज ऑफ प्रोफेशनल स्टडीजच्या प्रिन्सिपल श्रीमती अंजली अण्णा पवार यांनी रॅलिस फाउंडेशन, शिक्षक, विद्यार्थी, पालक, स्वयंसेवक आणि सर्व सहभागी महिला संघांचे मनःपूर्वक आभार मानले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना हक्काचे सांस्कृतिक व्यासपीठ मिळाल्याबद्दल मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.











