राज्यशासनाच्या नव्या विमा योजनेला प्रारंभ
ग्रामपंचायत सरसावल्या
चिपळूण (प्रतिनिधी) : राज्यशासनामार्फत केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत पशुधन विमा योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून कोकणातील पशुधनाला उर्जितावस्था येण्यास मदत होणार आहे. त्यासाठी पशुवैद्यकिय विभागासह पंचायत समिती व ग्रामपंचायतदेखील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी सरसावल्या आहेत.
कोकणात गेल्या काही वर्षांपासून दुग्ध व्यवसायात मरगळ निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी पशुपालन बंद करून अन्य व्यवसायाकडे वळले आहेत. परिणामी गावोगाव व शहरातही मोकाट जनावरांचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा रस्त्यावर या जनावरांचा वावर दिसून येतो. यामध्ये देशी व दुधाळ जनावरांचादेखील सहभाग आढळून येतो. परंतु हे पशुधन उपयोगी येत नसल्याने दिवसेंदिवस कोकणात दुधाचे प्रमाणही घटत आहे. या परिस्थितीमुळे कोकणात अस्तित्वात असलेल्या तालुकानिहाय शासकीय दुध डेअरीदेखील बंद पडल्या आहेत. त्याची मालमत्ता आज पूर्णत: पडिक व निकामी झालेली आहे. अशा परिस्थितीत खासगी दुध डेअऱ्या उभ्या राहत आहेत. परंतु पशुधन योग्य प्रमाणात नसल्याने दुधाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटले आहे. बऱ्याचदा जनावरांच्या पालन-पोषणाचा प्रश्न निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे दुर्लक्ष केले आहे. अनेकदा होतकरू शेतकऱ्यांनी गिर, लाल कंधारी, साहिवाल यासारख्या किमती व दुभती जनावरे आणून नव्याने व्यवसाय सुरू केला. परंतु त्यामध्ये अनेकांना अपयश आल्याचे पुढे आले आहे. अनेकदा योग्य पद्धतीच्या देखभाल अभावी जनावरे दगावली जात असल्याने त्याचा फटका बसत आला आहे. त्यासाठी शासनाच्या या पशुधन विमा योजनेचा मोठा लाभ होणार आहे.
‘पशुधनाला विमा संरक्षण, पशुपालकांच्या आर्थिक सुरक्षिततेची हमी’ या घोषवाक्याच्या आधारे शासनाने एक, दोन व तीन वर्षांसाठी पशुधन विमा योजना सुरू केला आहे. यामध्ये दुग्ध गाय, दुग्ध म्हैस, बैल, रेडा, शेळी व मेंढी यांना एक वर्षासाठी ३ हजार रूपये, २ वर्षासाठी सरासरी ६ हजार रूपये व ३ वर्षासाठी सरासरी ८ हजार रूपये इतका विमा हप्ता राहणार असून त्यामध्ये केंद्र व राज्य शासनामार्फत ८५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. तर लाभार्थी शेतकऱ्याला विमा हप्त्याच्या १५ टक्के हिस्सा भरावा लागणार आहे. यामध्ये जनावरांचा अनपेक्षित मृत्यू, रोगराई, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानापासून संरक्षण देण्याचे नियोजन या विमा योजनेत करण्यात आले आहे.













