भाजपा अनुसूचित जाती मोर्चातर्फे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन; अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव
मंडणगड प्रतिनिधी :
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, कोन्हवली येथे जागतिक कन्या दिनानिमित्त विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
यावेळी विद्यार्थिनींचे कौतुक करताना अभिजीत देवळेकर म्हणाले, “मुलगी ही केवळ कुटुंबाची जबाबदारी नसून समाजाच्या उज्ज्वल भवितव्याची शक्ती आहे. मुलींना शिक्षण, समान संधी आणि आत्मविश्वास मिळाला तर त्या प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतात. कन्यांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता त्यांच्या शिक्षणाला आणि स्वप्नांना सातत्याने प्रोत्साहन देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”
या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पंदिरकर तसेच उपशिक्षक चुनिलाल गोसावी उपस्थित होते. शिक्षकांनी या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले.












