एकत्रित कुटुंबाची परंपरा आणि भक्तीचा अनोखा मेळ
सावंतवाडी । सचिन रेडकर : कोकणातील गणेशोत्सव म्हणजे केवळ एक सण नसून तो सांस्कृतिक परंपरा, कौटुंबिक आपुलकी आणि अलौकिक भक्तीचा भावसोहळा असतो. आजच्या आधुनिक युगात आणि बदलत्या काळात एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली असली, तरीही काही ठराविक घराण्यांप्रमाणेच सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील ‘बारा-पाच’ अर्थात गांवकर कुटुंबाने मात्र आपली शेकडो वर्षांची सांस्कृतिक परंपरा आजही अत्यंत जिद्दीने आणि श्रद्धेने जतन करून ठेवली आहे. शेकडो सदस्यांचे हे भव्य कुटुंब दरवर्षी एकत्र येऊन आपल्या मानाच्या गणरायाची अत्यंत भावनिष्ठेने सेवा करते.
सोनुर्ली दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर मानल्या गेलेल्या श्रीदेवी माऊलीच्या पुनित पावन वास्तव्याने जगप्रसिद्ध झालेले गाव. याच गावातील या मानाच्या बारा पाच
गावकर कुटुंबातील हा गणेशोत्सव देखील सुप्रसिद्ध आहे. या गणपतीची नऊ फूट उंचीची भव्य आणि प्रसन्न गणेशमूर्ती संपूर्ण सोनुर्ली गाव, पंचक्रोशी आणि सावंतवाडी तालुक्यात आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरते. यावर्षीची ही चतुर्भुज गणेशमूर्ती एका नक्षीकाम केलेल्या भव्य सिंहासनावर विराजमान असून अतिशय दिमाखदार आणि तेजस्वी दिसते. गणरायाने गुलाबी व जांभळ्या छटा असणारे रेशमी काठपदराचे सोवळे परिधान केले आहे. मूर्तीच्या गळ्यात भरजरी दागिने, मोत्यांच्या व फुलांच्या माळा शोभा वाढवत असून डोक्यावर सुवर्णमुकुट, हातात बाजूबंद आणि कड्यांची नक्षीदार शोभा आहे. उजव्या अभयहस्तावर ‘स्वस्तिक’ चिन्ह कोरलेले असून डाव्या वरच्या हातात तांबडे कमळाचे फूल शोभून दिसत आहे. भगवान गणेशाच्या चरणांशी त्यांचा वाहन मूषकराज मोदक हातात धरून भक्तिभावाने बसलेला दिसतो, तर सिंहासनाच्या दोन्ही बाजूंना द्वारपालांच्या सुबक मूर्ती आहेत.
विशेष म्हणजे, या मूर्तीचे घडकाम आणि रंगकाम परंपरेप्रमाणे गावकर कुटुंबातील सदस्य स्वतःच करतात. रंगकामातील बारकावे आणि देखणी सजावट यामुळे या मूर्तीचे रूप अत्यंत देखणे व विलोभनीय ठरते.
या गणेशोत्सवासाठी खास मुंबईहून चाकरमानी कुटुंबीय दागिने आणि सजावटीचे साहित्य घेऊन गावी दाखल होतात. गणेशचतुर्थीच्या दिवशी संपूर्ण कुटुंब एकत्रित येऊन महापुजेने या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करते. या गणरायाला दाखवला जाणारा नैवेद्य इतका अलोट असतो की, तो ठेवण्यासाठी मोठा हॉलदेखील कमी पडतो. दरवर्षी मुख्य पूजेचा मान आलटून-पालटून एका-एका कुटुंबाला मिळतो. सर्व कुटुंबांच्या घरी शिजवलेला महाप्रसाद महाआरतीनंतर बाप्पाला अर्पण केला जातो आणि त्यानंतर सर्वांचे एकत्रित सहभोजन पार पडते. गावात गणपतीसमोर फुगड्या, भजने आणि आरत्यांचा गजर असतो. सावंतवाडी शहरासह सोनुर्ली गावात प्रसिद्ध असलेले हलते देखावे आणि आरती देखावे आजही येथे पारंपरिक पद्धतीने सादर केले जातात.
सोनुर्लीतील हे गावकर कुटुंबीय अकरा दिवस मनोभावे आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा करतात. सालाबादप्रमाणे दहाव्या दिवशी श्री सत्यनारायण महापूजा संपन्न होते. या मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी संपूर्ण जिल्ह्यातून भाविक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची मोठी गर्दी जमते. अकराव्या दिवशी किंवा अनंत चतुर्दशीला या गणरायाचे अत्यंत धुमधडाक्यात व विसर्जन मिरवणुकीने विसर्जन केले जाते. फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी आणि गजरात लहान-थोर अश्रूभऱ्या डोळ्यांनी व भक्तिभावाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. सोनुर्लीच्या ‘बारा-पाच’ गावकर कुटुंबाचा हा गणेशोत्सव म्हणजे कौटुंबिक ऐक्य, संस्कृती आणि भक्तीचा एक अनोखा आदर्श आहे.












