गोव्यात पर्यटकांवर अव्वाच्या सव्वा ऑनलाइन चलने ; पर्यटकांमध्ये नाराजी 

‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेची सामाजिक कार्यकर्ते श्रेयस मुंज यांची मागणी

सावंतवाडी । प्रतिनिधी :गोव्यात येणाऱ्या पर्यटकांवर ऑनलाइन वाहतूक प्रणालीतील तांत्रिक त्रुटी आणि चुकीच्या प्रक्रियेमुळे हजारो रुपयांचे दंड लादले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. अनेक पर्यटकांना थेट १० हजार, १७ हजार ते २० हजार रुपयांपर्यंतची मोठी चलने आली आहेत. या अवाजवी दंडामुळे पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शासनाने तातडीने ‘वन टाइम सेटलमेंट’ योजना आणावी आणि ऑनलाइन दंड भरण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रेयस मुंज यांनी पंतप्रधान, गोव्याचे मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गोवा हे देशातील प्रमुख पर्यटन केंद्र असल्याने महाराष्ट्र तसेच देशभरातून लाखो पर्यटक येथे नियमितपणे येतात. मात्र अशा प्रकारे लादल्या जाणाऱ्या अवाजवी दंडाच्या रकमांमुळे पर्यटकांवर मोठा आर्थिक भुर्दंड पडत असून, गोव्याच्या पर्यटन प्रतिमेलाही मोठा धक्का पोहोचत आहे. याशिवाय अशा चलनांची पूर्तता करण्यासाठी पर्यटकांना पुन्हा गोव्यात फेऱ्या माराव्या लागल्यास त्यांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च नाहक वाढतो.

शासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दंडाच्या रकमेत कपात करावी आणि एकदाच कमी रक्कम भरून प्रकरण निकाली काढण्याची संधी पर्यटकांना द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यासोबतच, गोव्याच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांतील नागरिकांसाठी या योजनेमध्ये विशेष सवलत देण्याची गरजही श्रेयस मुंज यांनी व्यक्त केली आहे.

केवळ प्रणालीतील दोषामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने जारी झालेली चलने पडताळणी करून तातडीने रद्द करण्यात यावीत. तसेच महाराष्ट्रातून गोव्यात येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पत्रादेवी चेकपोस्टवर एक विशेष तक्रार व तांत्रिक सहाय्य कक्ष उभारावा, जेणेकरून तेथेच चलनाचा तपशील, तक्रार नोंदणी आणि आवश्यक मदत पर्यटकांना सहज मिळू शकेल. कायद्याचे पालन व्हायलाच हवे, मात्र प्रशासकीय किंवा तांत्रिक चुकांचा नाहक त्रास पर्यटकांना होऊ नये आणि त्यांचा विश्वास कायम राहावा यासाठी प्रशासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, असे आवाहनही या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.