सुभाष लाड यांची रत्नसिंधू (गोठणे) पतसंस्थेच्या संचालकपदी निवड

लांजा (प्रतिनिधी) : राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या संस्थेचे अध्यक्ष सुभाष लाड यांची रत्नसिंधू (गोठणे) क्रेडिट सोसायटी विक्रोळी या पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ज्ञकोकणातील चाकरमान्यांना मुंबईत त्यांना स्वतःच्या हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी, त्यांना बचतीतून आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी गेली ३३ वर्ष रत्नसिंधू पतसंस्थेने मोठा आधार दिला. संस्थापक अध्यक्ष तातोबा हाटले यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संचालकांच्या मदतीने ही पतसंस्था कोकणातील चाकरमान्यांच्या अडीअडचणीत सदैव मदतीस धावणारी म्हणून लौकिक मिळवून आहे. कोरोना काळातही सभासदांना दहा टक्के लाभांश देणारी ही पतसंस्था उलाढालीचा सतरा कोटींचा पल्ला पार करून यशस्वी वाटचाल करीत आहे.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ या कोकणातील नामांकित संस्थेचे अध्यक्ष असलेल्या व गेली पंचवीस वर्षे या पतसंस्थेचे क्रियाशील सभासद म्हणून कार्यरत असलेल्या सुभाष लाड यांच्या सहकार क्षेत्रातील अनुभवाचा विचार करून पतसंस्थेने त्यांना तज्ञ संचालक म्हणून नियुक्ती करुन पतसंस्थेच्या ३३ व्या वार्षिक सभेत त्यांना सन्मानीत केले त्याबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान सुभाष लाड यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर लांजा तसेच राजापूर तालुक्यातील मित्रपरिवार ,हितचिंतक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे