राजापूरात कर्मवीर विचारांचा जागर

कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंती निमित्त शोभायात्रा उत्साहात पार

राजापूर (वार्ताहर): महाराष्ट्राच्या शैक्षणिक सामाजिक क्षेत्राचा आधारशीला असणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ व्या जयंती निमित्त रयत शिक्षण संस्थेच्या, आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे वतीने राजापूर शहरातील जकात नाका ते जवाहर चौक अशी कर्मवीरांच्या प्रतिमेसह शोभायात्रा काढण्यात आली.
शोभायात्रा शुभारंभ महाविद्यालयीन विकास समितीचे निमंत्रित सदस्य व पंचायत समिती प्रसाद मोहोरकर यांच्याहस्ते झाला. कर्मवीरांचा जयजयकार, रयत शिक्षण संस्थेचा जयजयकार रयत माऊलीचा जयजयकार व छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षि शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या घोषणांच्या निनादात तसेच कोकणची सांस्कृतिक परंपरा असलेल्या ढोल आणि झांज पथकाने कर्मवीरांच्या विचाराला आदरांजली अर्पण केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजाराम राठोड यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व जवाहर चौकातील शिवतीर्थावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शोभायात्रेचा समारोप जवाहर चौक येथे झाला.
यावेळी राजापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जयप्रकाश नार्वेकर, संदेश जाधव, प्रतिभा रेडीज, शोहेब मुजावर, विवेक मोरे, कृष्णा करंबेळकर या माजी विद्यार्थ्यांनी करवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजाराम राठोड व सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. राजेंद्र बावळे यांच्या नेतृत्वाखालील शोभायात्रेत महाविद्यालयाचे उपप्राचार्य,सर्व विद्याशाखांचे विभागप्रमुख,प्राध्यापक वृंद शिक्षकेतर व प्रशासकीय कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उपप्राचार्य डॉ. संजय मेस्त्री यांनी शोभायातत्रेच्या यशस्वी संयोजनासाठी हातभार लागलेल्या नगरपरिषद, पोलीस प्रशासन तसेच सर्व ज्ञात-अज्ञात घटकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. या शोभायात्रेस महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर सेवक व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.