जैतापूरचा मुख्य चौक सोलर हायमास्टने उजळला

दोन प्रवासी निवारा शेडही पुर्ण
जैतापूर वासीयांतुन समाधान

जैतापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील सागरी महामार्गावरील महत्त्वाचे आणि ऐतिहासिक गाव म्हणून ओळख असलेल्या जैतापूरच्या मुख्य चौकाचा गेल्या महिनाभरात झालेल्या विविध विकासकामांमुळे चेहरामोहरा बदलला आहे. मुख्य चौकामध्ये जिल्हा परिषद सदस्य सोनाली ठुकरूल यांच्या माध्यमातून हायमास्ट सोलर पथदीप बसविण्यात आला आहे. त्यामुळे हा मुख्य चौक परिसर प्रकाशमान झाला आहे.
तर जैतापूर ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्य चौकामध्ये एका बाजूला प्रवासी निवारा शेड उभारण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रवाशांसाठी निवारा शेड उभारण्याची मागणी जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने राजापूरचे आमदार किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांच्याकडे करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत आ. सामंत यांच्या माध्यमातून मुख्य चौकाच्या दुसऱ्या बाजूला प्रवासी निवारा शेड उभारण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या महिनाभराच्या कालावधीत जैतापूरच्या मुख्य चौकामध्ये हायमास्ट सोलर पथदीप आणि दोन्ही बाजूंना प्रवासी निवारा शेड अशी तीन महत्त्वाची विकासकामे पूर्ण झाली आहेत. या सुविधांचा लाभ जैतापूरसह परिसरातील नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.
जैतापूर हे सागरी महामार्गावरील महत्त्वाचे आणि ऐतिहासिक गाव असून, गावाचा मुख्य चौक हा नेहमीच वर्दळीचा केंद्रबिंदू राहिला आहे. त्यामुळे या ठिकाणी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांची पूर्तता झाल्याने जैतापूरच्या विकासाला आणखी एक सकारात्मक दिशा मिळाली आहे.
या विकासकामांसाठी जैतापूर ग्रामपंचायत, आमदार किरण उर्फ भैय्या शेठ सामंत आणि जिल्हा परिषद सदस्य सोनाली ठुकरूल यांचे जैतापूरवासीयांकडून आभार व्यक्त करण्यात येत असून, मुख्य चौकात झालेल्या या तीनही विकासकामांबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेषतः प्रवासी निवारा शेडसाठी मागणी करून त्याचा पाठपुरावा करणाऱ्या जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचेही अभिनंदन होत आहे.