रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त समर्थ भंडारी नागरी पतसंस्थेतर्फे २ ऑक्टोबरला रक्तदान शिबीर

चिपळूण (प्रतिनिधी) : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूणच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या वतीने शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांनी केले आहे.
रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणारी लोकसेवा आहे. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, प्रसूतीदरम्यान रक्ताची गरज असलेल्या महिला तसेच विविध आजारांवरील उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी वेळेवर रक्त उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असते. ही गरज लक्षात घेऊन संस्थेने आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमासाठी अपरांत हॉस्पिटल, दुसरा मजला, भोगाळे, चिपळूण येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदानासाठी इच्छुक नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरास भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज, डेरवण यांचे सहकार्य लाभणार आहे. त्यामुळे रक्तदात्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा व नियोजन करण्यात येणार आहे. श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व संचालक मंडळाच्या वतीने “रक्तदान ही एक लोकसेवा किंवा ईश्वरसेवा आहे” हा संदेश देत नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमातून समाजोपयोगी कार्याला चालना मिळणार असून, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. रक्तदान शिबिराबाबत अधिक माहितीसाठी ९४२३२९४४३३, ९६७३६२५८७२ आणि ९४०३५०४६६१ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.