जि.प. सदस्या सौ. पूजा निकम यांनी घेतले ‘सावर्डेचा राजा’चे दर्शन

आरोग्य तपासणी शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावर्डे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विराजमान झालेल्या “सावर्डेचा राजा” गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजा शेखर निकम यांनी भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सावर्डे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या समन्वयातून “श्री गणेशा आरोग्य अभियान २०२६” अंतर्गत सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे, आनंद नर्सिंग होम सावर्डे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले. तसेच श्रमिक कृषी संवर्धन संस्था यांच्या वतीने कृषी विषयक माहिती केंद्र आयोजित केले. शिबिरामध्ये नागरिकांची रक्त तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी तसेच विविध प्राथमिक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला. विशेषतः महिलांचा सहभाग लक्षणीय होता. अनेक महिलांनी तपासणी करून आरोग्यविषयक मार्गदर्शन घेतले. यावेळी शिबिराला भेट देताना सौ. पूजा निकम यांनी रुग्णांच्या तपासणी अहवालांचा आढावा घेतला. आवश्यकतेनुसार रुग्णांना योग्य औषधोपचार व औषधांचे वितरण करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे असे उपक्रम ग्रामीण भागासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या प्रसंगी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक केतन पवार, जिल्हा परिषद सदस्य संजय कदम, पंचायत समिती सदस्य शौकत माखजनकर, नितीन कोल्हापुरे, विकास नलावडे, सानिका भुवड, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, आशासेविका तसेच परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य तपासणीसह सामाजिक बांधिलकी जपत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. गणेशोत्सवाच्या धार्मिक वातावरणात आरोग्य जनजागृतीचा संदेश देणारा हा उपक्रम विशेष ठरला.