मुख्याध्यापक प्रभाकर राठोड यांना प्रवासात हृदयविकाराचा तीव्र झटका; कळणे गावावर शोककळा
दोडामार्ग (प्रतिनिधी):
कळणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ चे मुख्याध्यापक प्रभाकर राठोड यांचे काल सायंकाळी सावंतवाडीहून दोडामार्गच्या दिशेने प्रवास करत असताना माजगाव येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी एका उमद्या, ध्येयवादी आणि हरहुन्नरी शिक्षकाचा असा अचानक एक्झिट घेतल्याने कळणे गावासह संपूर्ण दोडामार्ग तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.
प्रभाकर राठोड हे अत्यंत सुस्वभावी, हसतमुख आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारे शिक्षक म्हणून परिचित होते. त्यांचे प्रभावी वक्तृत्व, हसत-खेळत शिकवण्याची विशेष शैली आणि स्नेहपूर्ण स्वभावामुळे त्यांनी अल्पावधीतच विद्यार्थ्यांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले होते.
कळणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ मध्ये गेल्या दीड-दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केवळ शैक्षणिक गुणवत्तेवरच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावरही विशेष भर दिला. त्यांच्या प्रेमळ मार्गदर्शनामुळे विद्यार्थी त्यांच्याशी सहज जोडले गेले होते, तर ग्रामस्थ आणि पालकांचाही त्यांच्यावर दृढ विश्वास व आदर होता.
त्यांच्या आकस्मिक निधनाची दुःखद बातमी गावात पोहोचताच शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. एक कर्तव्यनिष्ठ, संवेदनशील आणि विद्यार्थ्यांवर उदंड प्रेम करणारा मार्गदर्शक गमावल्याची भावना कळणेवासियांनी व्यक्त केली.
प्रभाकर राठोड यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.












