सावंतवाडी । प्रतिनिधी :
नीट परीक्षेत यश मिळवून चिंचवड-पुणे येथील लोकमान्य होमिओपॅथी एसएमसी महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश निश्चित केलेल्या ज्ञानेश गणेश नाईक याला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने २० हजार रुपयांचा धनादेश प्रदान करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
ज्ञानेश नाईक हा अत्यंत हुशार, होतकरू आणि अभ्यासाची आवड असलेला विद्यार्थी आहे. मात्र, कौटुंबिक परिस्थितीमुळे त्याला पुढील शिक्षणासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन त्याने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे व शरदिनी बागवे यांच्याशी संपर्क साधला होता. त्याची शिक्षणाची जिद्द पाहून प्रतिष्ठानच्या सदस्या शरदिनी बागवे यांनी स्वतः वैयक्तिक १० हजार रुपये आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून १० हजार रुपये अशा एकूण २० हजार रुपयांची मदत धनादेशाद्वारे उपलब्ध करून दिली.
या धनादेश वाटप प्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, सचिव समीरा खलील, सदस्या शरदिनी बागवे, रूपा मुद्राळे, हेलन निबरे, समीता बागवे, रवी जाधव, सामाजिक कार्यकर्ती प्रतिभा दवळी आणि ज्ञानेश नाईक उपस्थित होते. उपस्थित मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी ज्ञानेशच्या भावी शैक्षणिक प्रवासासाठी त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या.












