सावंतवाडी । प्रतिनिधी : जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासोबतच दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण व पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर (IAS) यांनी सावंतवाडी तालुक्याचा विस्तृत दौरा केला. या संयुक्त दौऱ्यादरम्यान नेमळे, वेत्ये, बांदा आणि भालावल या गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन विविध विकासकामांची पाहणी करण्यात आली तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
दौऱ्याच्या सुरुवातीला नेमळे येथे श्रमदानातून उभारण्यात येणाऱ्या वनराई बंधाऱ्याच्या बांधकामाचा आणि VB-GRAM-G अंतर्गत जलतारा खड्डा कामाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. सध्याच्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत गावपातळीवर पाणी अडविणे, पाण्याचे पुनर्भरण करणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्यावर यावेळी भर देण्यात आला. त्यानंतर वेत्ये येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीची व नळजोडणीच्या कामांची पाहणी करून नागरिकांना वेळेत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कामे वेगाने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधितांना देण्यात आले.
शैक्षणिक व सामाजिक सुविधांचा आढावा घेताना बांदा येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ ला भेट देण्यात आली. तेथे PM-SHRI शाळा उपक्रमांतर्गत डिजिटल क्लासरूमसह उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध शैक्षणिक सुविधांची पाहणी करण्यात आली आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यात आला. तसेच शाळेतील शौचालय व अन्य मूलभूत सुविधांची पाहणी करून दर्जेदार शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यावर चर्चा झाली. यानंतर भालावल ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन तेथील दुष्काळसदृश परिस्थितीतील उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले. यावेळी १५ वा वित्त आयोग, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण, जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती-जमाती विकास कार्यक्रम आणि VB-GRAM-G या योजनांच्या कामांची सद्यस्थिती तपासून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
भालावल येथे VB-GRAM-G अंतर्गत सन २०२६-२७ मधील लाभार्थी रामचंद्र वामन परब यांच्या काजू लागवड क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. सोबतच जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत बांधण्यात आलेल्या प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीची पाहणी झाली. भालावल येथील अंगणवाडीस भेट देऊन एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) अंतर्गत बालकांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा आणि उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. तसेच VB-GRAM-G योजनेचे लाभार्थी वसंत महादेव परब यांच्या शेतातील बायोगॅस संयंत्र आणि पशुपालन गोठ्याची पाहणी करून ग्रामीण कुटुंबांना शाश्वत उपजीविकेच्या संधी मिळवून देणाऱ्या योजनांची माहिती घेण्यात आली.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर यांच्या या संयुक्त दौऱ्यामुळे जलसंधारण, पाणीपुरवठा, शिक्षण, ग्रामविकास आणि उपजीविकेशी संबंधित कामांना मोठा वेग मिळाला असून, योजनांचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरून असा क्षेत्रीय आढावा सतत घेतला जात आहे.











