पणजी-गोवा येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक व आ. डिलेला लोबो यांच्या हस्ते सन्मान
चिपळूण (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंजिता चॅरिटेबल फाउंडेशनच्या संस्थापक रंजिता ओतारी यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ‘भारत निर्माण योगदान ॲवॉर्ड २०२६ ऑल इंडिया बेस्ट सोशल वर्कर महाराष्ट्र’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी पणजी, गोवा येथे ‘आपला वैभव फाउंडेशन’च्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद भाऊ नाईक तसेच आमदार डिलेला लोबो यांच्या हस्ते रंजिता ओतारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. रंजिता चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. समाजातील विविध घटकांसाठी सातत्याने काम करताना सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या कार्यात फाउंडेशनच्या संपूर्ण टीमची मोलाची साथ मिळत असल्याचे रंजिता ओतारी यांनी सांगितले. आपल्या सामाजिक कार्यामागे कुटुंबीय, समाजातील ज्येष्ठ नागरिक, पत्रकार बांधव, शिक्षक, पालक, विद्यार्थी, मित्र-मैत्रिणी तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांचे सहकार्य आणि आशीर्वाद असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्वांच्या शुभेच्छा, प्रेम आणि पाठिंब्यामुळेच सामाजिक कार्य सातत्याने सुरू ठेवण्याची प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. “पुरस्कार मिळाल्याचा आनंद होतो; मात्र त्याचबरोबर सामाजिक कार्याची जबाबदारीही वाढते. या सन्मानामुळे पुन्हा नव्या जोमाने समाजासाठी काम करण्याची प्रेरणा आणि बळ मिळाले आहे,” अशी भावना रंजिता ओतारी यांनी व्यक्त केली.
या पुरस्काराबद्दल ‘आपला वैभव फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष वैभव विरकर यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. तसेच आजपर्यंतच्या सामाजिक कार्यात साथ देणाऱ्या कुटुंबीय, सहकारी, हितचिंतक आणि नागरिकांचेही त्यांनी आभार व्यक्त केले. २०२६ या वर्षात मिळालेला हा तिसरा पुरस्कार असल्याने रंजिता ओतारी यांच्यासाठी हा सन्मान विशेष आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला आहे.











