मसुरे | झुंजार पेडणेकर :
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (‘आत्मा’), सिंधुदुर्ग अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षाकरिता कृषि व कृषि संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय व दिशादर्शक कामगिरी करणाऱ्या वैयक्तिक शेतकऱ्यांना आणि शेतकरी गटांना जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारांसाठी जिल्ह्यातील पात्र शेतकरी व शेतकरी गटांकडून १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील प्रगतशील, प्रयोगशील शेतकरी बंधू-भगिनींनी व नोंदणीकृत शेतकरी गटांनी या पुरस्कार योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज करावेत, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी कणकवली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
आत्मा कॅफेटेरिया अंतर्गत ‘वैयक्तिक शेतकरी पुरस्कार’ या बाबी अंतर्गत कृषि, फलोत्पादन, सेंद्रिय शेती, आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया, विपणन व कृषि विस्तारात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार दिले जाणार आहेत . जिल्ह्यातून गुणवत्तेनुसार निवड झालेल्या १० उत्कृष्ट शेतकऱ्यांना प्रति शेतकरी रु. २५,०००/- (रुपये पंचवीस हजार) व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येईल.
यासाठी प्रमुख पात्रता व निकष म्हणजे अर्जदार शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर शेती असावी व शेती हा मुख्य व्यवसाय असावा (महिला शेतकऱ्यांच्या बाबतीत स्वतःच्या किंवा पतीच्या नावावर शेती असावी). अर्जदाराकडे Farmer ID असणे अनिवार्य आहे (महिला शेतकऱ्यांना Farmer ID ची अट लागू नाही). अर्जदारास यापूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाचा कोणताही कृषि पुरस्कार मिळालेला नसावा. शासकीय/निमशासकीय सेवेतील अथवा सेवानिवृत्त कर्मचारी/अधिकारी या पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत. अर्जासोबत जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाचा चारित्र्य पडताळणी दाखला जोडणे आवश्यक आहे. आत्मा कॅफेटेरिया अंतर्गत ‘शेतकरी गट पुरस्कार’ या बाबी अंतर्गत शेतकऱ्यांमध्ये संघटितपणे शेती करणे, सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, एकत्रित खरेदी-विक्री व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी शेतकरी गटांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
▪️पुरस्काराचे स्वरूप: जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून सर्वोच्च गुण प्राप्त करणाऱ्या ०५ उत्कृष्ट शेतकरी गटांना प्रति गट रु. १०,०००/- (रुपये दहा हजार) व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येईल.
▪️प्रमुख पात्रता व निकष: केवळ ‘आत्मा’ अंतर्गत नोंदणीकृत असलेले शेतकरी गट, महिला बचत गट किंवा शेतकरी उत्पादक गट (CIG/FIG/SHG) या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. गटामध्ये किमान ११ सदस्य असणे अनिवार्य आहे (गट महिला, पुरुष किंवा मिश्र स्वरूपाचा असू शकतो). यापूर्वी आत्मा अथवा इतर कोणत्याही शासकीय योजनेतून गट पुरस्काराचा लाभ घेतलेला नसल्याबाबतचे हमीपत्र अर्जासोबत देणे बंधनकारक आहे.
▪️अर्ज कसा, कधी व कोठे करावा? अर्जाची उपलब्धता व पद्धत: इच्छुक शेतकरी व शेतकरी गटांनी विहित नमुन्यातील अर्ज, मार्गदर्शक सूचना व प्रपत्रे आपल्या संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (BTM) किंवा सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (ATM) यांच्याकडून प्राप्त करून घ्यावीत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत: पूर्ण भरलेले अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील प्रगतशील, प्रयोगशील शेतकरी बंधू-भगिनींनी व नोंदणीकृत शेतकरी गटांनी या पुरस्कार योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज करावेत, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी कणकवली यांच्या वतीने करण्यात आले आहे.












