शासकीय सेवा-सुविधांमुळे चाफेड गावच्या विकासाला नवी दिशा – सभापती गणेश राणे

स्वतंत्र पोस्ट कार्यालय आणि तलाठी कार्यालयाचा शुभारंभ

शिरगाव (प्रतिनिधी) :
देवगड तालुक्यातील चाफेड ग्रामपंचायतीच्या सुसज्ज इमारतीत स्वतंत्र पोस्ट कार्यालय आणि तलाठी कार्यालय सुरू झाल्याने गावाच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. भविष्यात ग्रामस्थांच्या मागणीनुसार पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पशुवैद्यकीय दवाखाना व आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावात अधिकाधिक बंधारे उभारल्यास भूजलपातळीत वाढ होण्यास मदत होईल. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे प्रयत्नशील असल्याचे देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांनी सांगितले.

चाफेड गावचे पोस्ट कार्यालय गेल्या ६३ वर्षांपासून आयनल येथे कार्यरत होते. ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर आता हे कार्यालय चाफेड ग्रामपंचायत इमारतीत स्वतंत्रपणे सुरू करण्यात आले. त्याचा शुभारंभ सभापती गणेश राणे यांच्या हस्ते, तर तलाठी कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे माजी तालुकाप्रमुख राजेंद्र शेट्ये यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी संदीप साटम म्हणाले, पोस्टाच्या व्यवहारात विश्वासार्हता असून बँकिंगसह विविध सेवा आता पोस्टाच्या माध्यमातून उपलब्ध होत आहेत. त्यामुळे ग्रामीण जनतेला त्याचा मोठा फायदा होईल. संबंधित अधिकाऱ्यांनी सेवेत सातत्य ठेवले तर जनतेचा विश्वास आणखी वाढेल. भविष्यात चाफेड ते साळशी व पिंपळवाडीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण, पशुवैद्यकीय दवाखाना आणि आरोग्य उपकेंद्राची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. ग्रामस्थांनी आपली एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.

डाक निरीक्षक श्रीराम वायाळ यांनी डाक सेवा विश्वासार्ह असून चाफेडमधील नूतन पोस्ट कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी सुमारे ५०० ग्राहकांनी खाती उघडल्याबद्दल ग्रामस्थांचे कौतुक केले.
सत्यवान भोगले यांनी स्वतंत्र पोस्ट कार्यालयासाठी माजी सरपंच कै. किरण मेस्त्री यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले. गावच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करावी, असा हा दिवस असल्याचे ते म्हणाले.यावेळी सरपंच साहिल पांचाळ आणि तलाठी अनंत अंधारी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा मुख्यमंत्री बळीराजा पाणंद योजनेचे सहअध्यक्ष संदीप साटम, सरपंच साहिल पांचाळ, उपसरपंच महेश राणे, जिल्हा डाक निरीक्षक श्रीराम वायाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष नार्वेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष तथा माजी सरपंच सत्यवान भोगले, तलाठी अनंत अंधारी, माजी सरपंच आकाश राणे, संतोष साळसकर, दीपली घाडी, ग्रामपंचायत सदस्य सुनील कांडर, मानसी परब, सुदर्शन साळकर, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष विजय परब, प्रवीण राणे, नूतन पोस्टमास्तर शरयू मुरुडकर, आयपीपीए निलेश ठाकूर, डाक निरीक्षक संदीप चव्हाण, एम. एम. आरलेकर, आयनल पोस्टमास्तर आनंद साटम, पोस्टमन सुनील घाडी, ग्रामपंचायत अधिकारी प्रथमेश देशमुख, साळशीचे माजी सरपंच वैभव साळसकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात विविध मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक साटम यांनी केले, तर आभार विजय परब यांनी मानले.