सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेकडून सभासदांसाठी १३ टक्के लाभांश जाहीर

संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

​सावंतवाडी : सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सिंधुदुर्ग या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच गोविंद चित्रमंदीर, सावंतवाडी येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत संस्थेच्या वतीने सभासदांसाठी १३ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
​सभेच्या सुरुवातीला संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी सभेपुढील विषय, वार्षिक अहवाल आणि इतर विविध विषयांचे वाचन सभागृहा समोर केले. सन २०२५-२०२६ या कालावधीत संस्थेने १ कोटी ३५ लाख रुपयांचा नफा कमावला आहे. तसेच संस्थेने एकत्रित ४५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य सहकारी संस्थांमध्ये आपली ओळख कायम ठेवली आहे. हा व्यवसाय आगामी काळात ७०० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.

​चालू आर्थिक वर्षात संस्थेने विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी अनेक निधींची उभारणी केली आहे. यामध्ये सभासदांच्या पाल्यांसाठी गुणगौरव निधी, कर्मचाऱ्यांसाठी सेवक कल्याण निधी, इमारत निधी, जिल्ह्यातील शाळांसाठी शैक्षणिक सक्षमीकरण निधी, संचालक व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण निधी, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांसाठी शैक्षणिक अभ्यास दौरा निधी, ३५ वर्ष प्रतिपूर्ती यशोगाथा सोहळा निधी, निवृत्त सैनिक सन्मान सोहळा निधी, डिपॉझिट टार्गेट बक्षीस निधी, कर्मचारी स्नेह मेळावा निधी, मयत सभासदांच्या अंत्यविधी कार्यासाठी निधी आणि कर्मचारी प्रोत्साहन भत्ता यांचा समावेश आहे. या निधींच्या माध्यमातून भविष्यात अनेक कल्याणकारी उपक्रम राबवले जाणार आहेत.
​सोनेतारण कर्जदारांसाठी संस्थेने ‘कुबेर गोल्ड गिफ्ट’ ही विशेष योजना जाहीर केली आहे. सोने व चांदीच्या तारणावर कर्ज घेणाऱ्या कर्जदारांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून भेटवस्तू देण्यात येणार असून, प्रत्येक तालुक्यातून ५ भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाणार आहे.

​संस्थेने सीएसडी कॅन्टीनसाठी लागणारे गोडाऊन तात्काळ बांधून दिले तसेच कमी भाड्याने जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे माजी सैनिकांची कित्येक वर्षांपासून बंद असलेली सीएसडी कॅन्टीन सेवा सिंधुदुर्गात पूर्ववत सुरू झाली आहे. याबद्दल सभासदांनी संचालक मंडळाचे विशेष अभिनंदन केले. याशिवाय, महाराष्ट्र शासनाचे सहकारी पतसंस्थांसाठीचे ‘आदर्श उपविधी’ संस्थेने एकमताने स्वीकृत केले आहेत.
यामुळे संस्थेच्या व्यवस्थापनात सुसूत्रता, विश्वासार्हता व सुयोग्य नियंत्रण येऊन सभासदांचे हित अधिक प्रभावीपणे जपले जाईल. कर्मचाऱ्यांसाठीही आदर्शवत सेवानियम तयार करण्यात आले असून त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त, प्रामाणिकपणा व कार्यक्षमता वाढेल.

​या सभेत शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या सभासदांच्या पाल्यांचा विशेष गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन सहकार्याबद्दल आभार मानले.पुढील वर्षापासून वार्षिक अहवाल डिजिटल स्वरूपात पाठवण्याचे धोरण ठरवण्यात आले असून, त्यामुळे छपाई आणि टपाल खर्चात बचत होऊन संस्थेचा नफा वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ​सभेच्या शेवटी अध्यक्ष बाबुराव कविटकर व मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी सर्व सभासद व हितचिंतकांचे आभार मानले.

या प्रसंगी संस्थेचे संचालक दिनानाथ सावंत, सुभाष सावंत, भिवा गावडे, चंद्रशेखर जोशी, शामसुंदर सावंत, संतोष मुसळे, बाबु वरक, शांताराम पवार, गोपाळ बाईत यांच्यासह संस्थेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.