महाबळेश्वर तालुक्यातून अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. महाबळेश्वरजवळील नावली गावात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जमीन खचण्यास सुरुवात झाली असून शेतजमिनी, घरे आणि गावातील अंतर्गत रस्त्यांना मोठमोठे तडे गेले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जमिनीची पकड कमकुवत झाली आहे. परिणामी गावातील अनेक भागात भूभाग खचला असून काही घरांमध्येही तडे गेल्याची माहिती समोर आली आहे. शेतजमिनींचेही मोठे नुकसान झाले असून गावातील रस्त्यांवर भेगा पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, गावातील पाण्याची उंच टाकीही धोकादायक स्थितीत असल्याची माहिती समोर येत आहे. जमीन आणखी खचल्यास ही पाण्याची टाकी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात असून, तसे झाल्यास खालच्या बाजूला असलेल्या गावांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन, ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून परिस्थितीची पाहणी सुरू आहे. नुकसानाचा पंचनामा केला जात असून आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. गरज भासल्यास धोकादायक भागातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याची तयारीही प्रशासनाने सुरू केली आहे.
दरम्यान, महाबळेश्वर परिसरात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे आणखी जमीन खचण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, धोकादायक भागात जाणे टाळावे आणि सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.












