गांधीजींच्या विचारांसोबत ‘पाणी वाचवा’चा संदेश; विद्यार्थ्यांना प्राचार्य राजेंद्र वारे यांचे आवाहन
चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती ‘अहिंसा दिन’ म्हणून विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी विद्यार्थ्यांना ‘पाणी हेच जीवन’ या विषयाचे महत्त्व पटवून देत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले.
प्रत्येक व्यक्ती पाणी पिताना आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी ग्लासमध्ये घेते आणि शिल्लक पाणी ओतून देते. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. त्यामुळे पाण्याची बचत करण्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही पाणी बचतीचे महत्त्व समजावून सांगावे, असे आवाहन प्राचार्य राजेंद्र वारे यांनी केले. याप्रसंगी महात्मा गांधी यांच्या जीवनातील विविध प्रसंग तसेच त्यांच्या विचारांचा विद्यार्थ्यांसमोर आढावा घेण्यात आला. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे व्यक्तिपत्रक विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका नेहा मेस्त्री व स्फूर्ती जाधव यांनी तयार केले होते. या व्यक्तिपत्रकाचे उद्घाटन संस्थेचे सचिव महेश महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना शार्दुल पाटील, साक्षी गोरे, युवराज रसाळ, दीप्ती लिबे व आर्या मोरे यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याचा गौरव केला. शिक्षक मनोगतात नेहा मेस्त्री यांनी या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांची जीवनशैली, साधेपणा आणि आदर्श तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांना सोप्या व सहज भाषेत समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व समजावे म्हणून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी सावर्डे बाजारपेठ सहानपरिसर मुंबई गोवा महामार्ग लगत परिसर स्वच्छता केली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक महेश कुलकर्णी, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्फूर्ती जाधव यांनी केले.













